टी-20 मालिकेत बांगलादेशची विजयी सलामी
विंडीजचा 7 धावांनी पराभव, मेहदी हसन मिराज ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / किंग्जस्टन
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने यजमान विंडीजचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात मेहदी हसन मिराजला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या साम्यात विंडीजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 20 षटकात 6 बाद 147 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा डाव 19.5 षटकात 140 धावांत आटोपला.
बांगलादेशच्या डावात सौम्या सरकारने 32 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 43, जाकरअलीने 27 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 27, मेहमी हसन मिराजने 24 चेंडूत 1 षटकार आणि 2चौकारांसह नाबाद 26, शमीम हुसेनने 13 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह 27 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 9 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे अकिल हुसेन आणि मॅकॉय यांनी प्रत्येकी 2 तर चेस आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बांगलादेशचे अर्धशतक 50 चेंडूत तर शतक 95 चेंडूत फलकावर लागले. 10 षटकाअखेर बांगलादेशने 3 बाद 56 धावा जमविल्या होत्या. मेहदी हसन मिराज आणि शमीम हुसेन यांनी सहाव्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर विंडीजचा डाव 19.5 षटकात 140 धावांत आटोपला. कर्णधार पॉवेलने एकाकी लढत 35 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 60 धावा जमविल्या. चार्ल्सने 12 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 20 तर शेफर्डने 17 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. विंडीजला 12 अवांतर धावा मिळाल्या. त्यांच्या डावात 7 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 36 धावा जमविताना 3 गडी गमविले. विंडीजचे अर्धशतक 50 चेंडूत तर शतक 87 चेंडूत फलकावर लागले. विंडीजची 10 षटकाअखेर स्थिती 5 बाद 57 अशी होती. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराजने 13 धावांत 4, हसन मेहमुदने 18 धावांत 2, तस्किन अहम्मदने 28 धावांत 2 तर साहीब आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकात 6 बाद 147 (सरकार 43, जाकरअली 27, मेहदी हसन मिराज नाबाद 26, शमीम हुसेन 27, अवांतर 8, अकिल हुसेन, मॅकॉय प्रत्येकी 2 बळी, चेस, रुदरफोर्ड प्रत्येकी 1 बळी), विंडीज 19.5 षटकात सर्वबाद 140 (पॉवेल 60, शेफर्ड 22, चार्ल्स 20, अवांतर 12, मेहदी हसन मिराज 4-13, हसन मेहमुद व तस्किन अहम्मद प्रत्येकी 2 बळी, शकिब आणि रिशाद हुसेन प्रत्येकी 1 बळी)