For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनडे मालिकेत बांगलादेशची विजयी सलामी

06:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
वनडे मालिकेत बांगलादेशची विजयी सलामी
Advertisement

लंका सहा गड्यांनी पराभूत, नजमुल हुसेन शांतो सामनावीर,

Advertisement

वृत्तसंस्था /चेतोग्राम

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ‘सामनावीर’ आणि कर्णधार नजमूल हुसेन शांतोच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर यजमान बांगलादेशने लंकेचा 32 चेंडू बाकी ठेवून सहा गड्यांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. लंकन संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात आहे. या पहिल्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्व बाद 255 धावा जमवल्या. त्यानंतर बांगलादेशने 44.4 षटकात 4 बाद 257 धावा जमवित विजय नोंदवला.

Advertisement

लंकेच्या डावामध्ये कर्णधार कुशल मेंडिस आणि लियानगे यांनी शानदार अर्धशतके झळकवली. कुशल मेंडिसने 75 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 59 तर लियानगेने 69 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 67 धावा केल्या. सलामीच्या निशांकाने 28 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 36 धावा जमवताना अविष्का फर्नांडोसमवेत सलामीच्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली फर्नांडोने 33 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 33 धावा केल्या. समरविक्रमा केवळ 3 धावा केल्या. असालेंकाने 2 चौकारासह 18 धावा जमवल्या. कुशल मेंडिस लियानगेने पाचव्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी केली. हसरंगाने 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 चेंडूत 13 धावा जमवल्या. लंकेने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 10 षटकात 71 धावा जमवताना एक गडी गमावले. तर तिसऱ्या आणि शेवटच्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 10 षटकात 35 धावा जमवताना 5 गडी गमावले. लंकेचे अर्धशतक 40 चेंडूत, शतक 112 चेंडूत, दीडशतक 179 चेंडूत, द्विशतक 223 चेंडूत तर 250 धावा 283 चेंडूत नोंदवल्या. लंकेच्या डावामध्ये 6 षटकात आणि 23 चौकार नोंदवले गेले. बांगलादेशतर्फे शोरीफुल इस्लाम, तस्कीन अहमद आणि तन्झ्मि साकिब यांनी प्रत्येकी 3 तर मेहदी हसनने एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सलामीचा लिटॉन दास मधुशंकाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर सौम्या सरकार तीन धावावर झेलबाद झाला. मधुशंकाने बांगलादेशला हा दुसरा धक्का दिला. मधुशेनने रिदॉयला तीन धावावर त्रिफळाचित केले. बांगलादेशची स्थिती यावेळी 3 बाद 23 अशी होती. कर्णधार नजमूल हुसेन शांतो आणि मेहमुदुल्ला याने चौथ्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी केली. कुमाराने मेहमुदुल्लाला झेलबाद केले. त्याने 37 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 37 धावा जमवल्या.

कर्णधार शांतो आणि मुशफिकुर रहीम यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 165 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला 32 चेंडू बाकी ठेवून सहा गड्यांनी विजय मिळवून दिला. शांतोने 129 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारासह नाबाद 122 तर रहीमने 84 चेंडूत 8 चौकारासह नाबाद 73 धावा झळकवल्या. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 25 चौकार नोंदवले गेले. लंकेतर्फे मधुशंकाने 2 तर मधुशेन आणि कुमारा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. बांगलादेशने पहिल्या पॉवर प्लेदरम्यानच्या 10 षटकात 55 धावा जमवताना 3 गडी गमवले. तर दुसऱ्या पॉवर प्लेमधील 30 षटकात 177 धावा जमवताना एक गडी गमावला. बांगलादेशचे पहिले अर्धशतक 55 चेंडूत, शतक 101 चेंडूत, दीडशतक 154 चेंडूत, द्विशतक 213 चेंडूत तसेच 250 धावा 264 चेंडूत फलकावर लागल्या. शांतोने शतक 108 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकाराच्या मदतीने झळकवले.

संक्षिप्त धावफलक : लंका 48.5 षटकात सर्वबाद 255 (निशांका 36, ए. फर्नांडो 33, कुशल मेंडिस 59, लियानगे 67, हसरंगा 13, असालेंका 18, अवांतर 12, एस. इस्लाम, तस्कीन अहमद, तंझीम हसन शकीब प्रत्येकी तीन बळी, मिराज एक बळी), बांगलादेश 44.4 षटकात 4 बाद 257 (नजमुल हुसेन शांतो नाबाद 122, मुशफिकर रहीम नाबाद 73, मेहमुदुल्ला 37, अवांतर 19, मधुशंका 2-44, मधुशेन 1-53, कुमारा 1-35).

Advertisement
Tags :

.