बांगलादेशची विजयी सलामी
स्कॉटलंडवर 16 धावांनी मात, रितू मोनी सामनावीर, सारा ब्राईसची झुंज अपुरी
वृत्तसंस्था/ शारजाह
महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बांगलादेश महिलांनी स्कॉटलंडचा 16 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर निर्धारित 20 षटकांत 7 बाद 119 धावा जमविल्या. सोभना मोस्तरी (38 चेंडूत 36 धावा) व सलामीवीर शती रानी (29) यांचे त्यात प्रमुख योगदान राहिले. कर्णधार निगार सुलतानाने चेंडूस धाव या गतीने 18 धावा जमविल्या तर फहिमा खातूनने 5 चेंडूत नाबाद 10 धावा जमविल्या. स्कॉटलंडतर्फे स्पिनर सास्किया होर्लेने 13 धावांत 3 बळी मिळविले. याशिवाय कॅथरीन ब्राईस, ऑलिव्हिया बेल, कॅथरिन फ्रेजर यांनी एकेक बळी मिळविले. त्यानंतर स्कॉटलंडची कर्णधार सारा ब्राईसने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना 52 चेंडूत नाबाद 49 धावा जमविल्या. पण इतर सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यांना 20 षटकांत 7 बाद 103 धावांपर्यंतच मजल मारता आली.
बांगलादेशच्या गोलंदाजांनी दडपण राखत स्कॉटलंडच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद करीत संघाला विजय मिळवून दिला. ब्राईसशिवाय स्कॉटलंडच्या अन्य दोन फलंदाजांनाच दुहेरी धावा करता आल्या. कर्णधार कॅथरिन ब्राईसने 11, प्रियानाझ चटर्जीनेही 11 धावा काढल्या. बांगलादेशची मध्यमगती गोलंदाज रितू मोनीने चार षटकांत भेदक मारा करीत केवळ 15 धावा देत 2 बळी टिपले. या कामगिरीने तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. याशिवाय मारुफा अख्तर, नाहिदा अख्तर, फाहिमा खातून, राबेया खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकांत 7 बाद 119 : शती रानी 32 चेंडूत 29, मुर्शिदा खातून 12, सोभना मोस्तरी 38 चेंडूत 36, निगार सुलताना 18, फाहिमा खातून नाबाद 10, अवांतर 3. गोलंदाजी : सास्किया होर्ले 3-13, फ्रेजर 1-23, ऑलिव्हिया बेल 1-23, कॅथरिन ब्राईस 1-23.
स्कॉटलंड 20 षटकांत 7 बाद 103 : सारा ब्राईस 52 चेंडूत नाबाद 49, कॅथरीन ब्राईस व ए. लिस्टर प्रत्येकी 11, लॉर्ना जॅक ब्राऊन 9, अवांतर 4. गोलंदाजी : रितू मोनी 2-15, राबेया खान 1-20, फाहिमा खातून 1-21, नाहिदा अख्तर 1-19, मारुफा अख्तर 1-17.