बांगलादेशचे पाकला चोख प्रत्युत्तर
शदमान इस्लाम, मोमीनुल हक्क, रहीम, दास यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / रावळपिंडी
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील शुक्रवारी खेळच्या तिसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशने पहिल्या डावात 5 बाद 316 धावा जमवित यजमान पाकला चोख प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी पाकिस्तानने आपला पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला. बांगलादेशच्या डावामध्ये शदमान इस्लामचे शतक 7 धावांनी हुकले. मोमीनुल हक्क, मुष्फीकर रहीम आणि लिटॉन दास यांनी दमदार अर्धशतके झळकविली. बांगलादेशचा संघ अद्याप 132 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे पाच गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बागी आहेत.
या कसोटी सामन्यात पाकने आपला पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला. सौद शकीलने 9 चौकारांसह 141 तर मोहम्मद रिझवानने 3 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 171 धावा झळकविताना पाचव्या गड्यासाठी 240 धावांची द्विशतकी भागिदारी केली. बांगलादेशने बिनबाद 27 या धावसंख्येवरुन शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. सलामीचा झाकीर हासन 12 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार नजमुल हुसेनने 16 धावा जमवित तंबूत परतला. शदमान इस्लाम व मोमीनुल हक्क यांनी तिसऱ्या गड्यासाठी 94 धावांची भागिदारी केली. मोमीनुल हक्कने 76 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. मोमीनुल बाद झाल्यानंतर शदमान इस्लामला मुष्फीकर रहीमने चांगलीच साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 52 धावांची भर घातली. शदमान इस्लाम मोहम्मद अलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 12 चौकारांसह 93 धावा जमविल्या. अष्टपैलु शकीब अल हसन केवळ 2 चौकारांसह 15 धावा जमवित तंबूत परतला. मुष्फीकर रहीम आणि लिटॉन दास यांनी संघाचा डाव सावरताना सहाव्या गड्यासाठी अभेद्य 98 धावांची भागिदारी केली. मुष्फीकर रहीम 7 चौकारांसह 55 तर लिटॉन दास 1 षटकार आणि 8 चौकारांसह 52 धावांवर खेळत आहेत. पाकतर्फे खुर्रम शेहजादने 2 तर नसीम शहा, मोहम्मद अली आणि सईम आयुब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सौद शकीलचा विक्रम
पाकचा फलंदाज सौद शकीलने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात शानदार शतक झळकवित त्याने फलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमधील किमान 10 डावांमध्ये सौद शकीलने धावांच्या सर्वोच्च सरासरीमध्ये दुसरे स्थान मिळविताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला मागे टाकले आहे. आता या सर्वोत्तम सरासरीमध्ये ऑस्ट्रेलियाचे दिवंगत सर डॉन ब्रॅडमन हे पहिल्या स्थानावर आहेत. बांगलादेश विरुद्ध शकीलने 9 चौकारांसह 261 चेंडूत 141 धावा जमविताना 54.02 स्ट्राईकरेट राखला हाता. शकीलने कसोटी क्रिकेटमध्ये आपला स्ट्राईकरेट 65.13 असा राखला आहे. शकीलने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम धावांच्या सरासरीमध्ये स्टिव्ह स्मिथ, न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलीयमसन व भारताच्या विराट कोहलीला मागे टाकले आहे. शकीलने 11 कसोटीतील 20 डावांत 65.17 धावांच्या सरासरीने 1108 धावा जमविल्या आहेत. त्यामध्ये 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. 20 फलंदाजांच्या या यादीमध्ये आशिया खंडातील भारताचा मयांक अगरवाल, पाकचा सईद अहम्मद, भारताचे चेतेश्वर पुजारा, यशस्वी जैस्वाल,विनोद कांबळी यांचा समावेश आहे.
संक्षिप्त धावफलक पाक प. डाव 113 षटकात 6 बाद 448 डाव घोषित (मोहम्मद रिझवान नाबाद 171, सौद शकील 141, सईम आयुब 56, शाहीन आफ्रिदी नाबाद 29, अवांतर 24, एस. इस्लाम, हसन मेहम्मुद प्रत्येकी 2 बळी, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश प. डाव 92 षटकात 5 बाद 316, (शदमान इस्लाम 93, मोमीनुल हक्क 50, मुष्फीकर रहीम खेळत आहेत 55, लिटॉन दास खेळत आहे 52, आवांतर 23, खुर्रम शेहजाद 2-47, नसीम शहा, मोहम्मदअली, सईम आयुब प्रत्येकी 1 बळी)