For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशचा आयर्लंडवर एकतर्फी मालिकाविजय

06:27 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशचा आयर्लंडवर एकतर्फी मालिकाविजय
Advertisement

मुशफिकुर रहीम सामनावीर, तैजुल इस्लाम मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान बांगलादेशने आयर्लंडचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. रविवारी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत लिटन दास आणि मुशफिकुर रहीम यांच्या शानदार शतकांच्या जोरावर तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामच्या शानदार कामगिरीमुळे बांगलादेशने आयर्लंडचा 217 धावांनी दणदणीत पराभव केला.

Advertisement

नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघाने बेलबर्नीच्या नेतृत्वाखाली आयर्लंड संघाचा या मालिकेत व्हाईटवॉश केला. या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने आयर्लंडला निर्णायक विजयासाठी 508 धावांचे कठिण आव्हान दिले होते. आयर्लंडने 6 बाद 176 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. मॅकब्राईन आणि कॅम्फर ही नाबाद जोडी आयर्लंडचा पराभव लांबविण्यासाठी प्रयत्न करीत होती. मॅकब्राईनने तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर पहिला चौकार मारला. ताजुल इस्लामने मॅकब्राईनला पायचीत केले. त्याने 53 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. तैजुल इस्लामचा कसोटीतील हा 250 वा बळी ठरला. जॉर्डन नीलने सुरुवातीला काही आक्रमक फटकेबाजी केली. कॅम्फरने आपले अर्धशतक 157 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने झळकाविले. यानंतर बांगलादेशने दुसरा नवा चेंडू घेतला. मेहदी हसन मिराजने जॉर्डन नीलला त्रिफळाचीत केले. त्याने 46 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 30 धावा जमविताना कॅम्फरसमवेत 8 व्या गड्यासाठी 48 धावांची भागिदारी केली. बांगलादेशच्या हसन मुरादने आयर्लंडचे शेवटचे 2 गडी बाद करुन आयर्लंडला दुसऱ्या डावात 291 धावांवर रोखले. गेव्हिन होएने 104 चेंडूत 4 चौकारांसह 37 धावा जमविताना कॅम्फरसमवेत 9 व्या गड्यासाठी 54 धावांची भागिदारी केली. कॅम्फरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 259 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 71 धावा झळकाविल्या. कॅम्फरला आपल्या संघाचा पराभव मात्र टाळता आला नाही. उपाहारानंतर काही मिनिटातच आयर्लंडचा दुसरा डाव आटोपला. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लामने 104 धावांत 4 तर हसन मुरादने 44 धावांत 4 गडी बाद केले. खलिद अहमद व मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. मुशफिकुर रहीमची ही 100 वी कसोटी आहे.

संक्षिप्त धावफलक - बांगलादेश प. डाव 476, आयर्लंड प. डाव 265, बांगलादेश दु. डाव 4 बाद 297 डाव घोषित आयर्लंड दु. डाव 113.3 षटकात सर्वबाद 291 (कॅम्फर नाबाद 71, होए 37, नील 30, मॅकब्राईन 21, टेक्टर 50, बेलबर्नी 13, कॅमेचेल 19, अवांतर 19, तैजुल इस्लाम व हसन मुराद प्रत्येकी 4 बळी, खलिद अहमद व मेहदी हसन मिराज प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.