बांगलादेशचा डाव 164 धावांत समाप्त
जेडेन सील्सचे 5 धावांत 4 बळी, शादमान इस्लामचे अर्धशतक विंडीज प. डाव 1 बाद 70
वृत्तसंस्था / किंग्जस्टन (जमैका)
येथील सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत विंडीजच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव 164 धावांत आटोपला. विंडीजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सने इकॉनॉमीचा आगळा विक्रम करताना केवळ 5 धावांत 4 गडी बाद केले. त्यानंतर विंडीजने खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर पहिल्या डावात 1 बाद 70 धावा जमविल्या.
या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आल्याने बराच खेळ वाया गेला. बांगलादेशने पहिल्या दिवसाअखेर पहिल्या डावात 2 बाद 69 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि 71.5 षटकात त्यांचा डाव 164 धावांत आटोपला. बांगलादेशचे शेवटचे 8 फलंदाज 95 धावांत बाद झाले.
बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या शादमान इस्लामने 137 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 64 तर शहादत हुसेनने 89 चेंडूत 2 चौकारांसह 22, कर्णधार मेहिदी हसन मिराजने 75 चेंडूत 2 चौकारांसह 36 आणि तैजुल इस्लामने 66 चेंडूत 1 चौकारांसह 16 धावा केल्या. बांगलादेशच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. बांगलादेशने खेळाच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत 6 बाद 122 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये त्यांनी 4 गडी गमविताना 53 धावा जमविल्या होत्या. चहापानापूर्वीच बांगलादेशचा पहिला डाव आटोपला. विंडीजतर्फे जेडेन सील्सने 15.5 षटकात केवळ 5 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. त्याने 10 षटके निर्धाव टाकली. सील्सला शमार जोसेफची चांगली साथ मिळाली. जोसेफने 49 धावांत 3 तर केमार रॉचने 45 धावांत 2 आणि अल्झारी जोसेफने 29 धावांत 1 गडी बाद केला. चहापानावेळी विंडीजने 10 षटकात बिनबाद 16 धावा जमविल्या होत्या.
चहापानानंतरच्या सत्राला प्रारंभ झाला आणि बांगलादेशच्या नाहिद राणाने लुईसला दासकरवी झेलबाद केले. त्याने 47 चेंडूत 1 चौकारांसह 12 धावा जमविल्या. कर्णधार ब्रेथवेट 115 चेंडूत 3 चौकारांसह 31 धावांवर तर कार्टी 60 चेंडूत 1 चौकारांसह 19 धावांवर खेळत होते. अंधुक प्रकाशामुळे पंचांनी दुसऱ्या दिवशीचा खेळ लवकर थांबविला. विंडीजचा संघ अद्याप 94 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत.
सील्सचा आगळा विक्रम
विंडीजचा वेगवान गोलंदाज सील्सने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजी करण्याचा आगळा विक्रम केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सील्सने 15.5 षटकांची गोलंदाजी करत केवळ 5 धावांच्या मोबदल्यात 4 गडी सील्सचा हा नवा विक्रम आहे. 23 वर्षीय सील्सने 0.30 अशा इकॉनॉमी रेटने यश मिळविले. 2015 साली भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने 0.42 इकॉनॉमी रेट राखत 9 धावांत 3 गडी बाद करण्याचा विक्रम नोंदविला होता. उमेश यादवचा विक्रम आता सील्सने मागे टाकला आहे.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प. डाव 71.5 षटकात सर्वबाद 164 (शादमान इस्लाम 64, शहादत हुसेन 22, मेहिदी हसन मिराज 36, तैजुल इस्लाम 16 अवांतर 8, जेडेन सील्स 4-5, रॉच 2-45, शमार जोसेफ 3-49, अल्झारी जोसेफ 1-29), विंडीज प. डाव 37 षटकात 1 बाद 70 (लुईस 12, क्रेग ब्रेथवेट खेळत आहे 33, कार्टी खेळत आहे 12 अवांतर 6, नाहिद राणा 1-28).