महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशचा लंकेवर पहिला विजय

06:58 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामनावीर शकीब हसन, नजमुल हुसेन यांची अर्धशतके : तन्झिम शकीबचे 3 बळी, असलंकाचे शतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकातील सामन्यात बांगलादेशने लंकेचा 3 गड्यांनी पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने मिळविलेला हा पहिलाच विजय आहे. 2 बळी व 82 धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार शकीब अल हसनला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. बांगलादेशचा हा आठ सामन्यातील दुसरा विजय असून 4 गुणांसह ते सातव्या स्थानावर आहेत तर आव्हान समाप्त झालेल्या लंकेचेही 4 गुण असून ते आठव्या स्थानावर आहेत.

चरिथ असलंकाच्या शानदार शतकाच्या जोरावर श्रीलंकेने सर्व बाद 279 धावा जमवित बांगलादेशसमोर विजयासाठी 280 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर बांगलादेशने 41.1 षटकांत 7 बाद 282 धावा जमवित विजय साकार केला. 2 बाद 41 अशा स्थितीनंतर नजमुल हुसेन शांतो व शकीब हसन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 169 धावांची भागीदारी करीत विजयाची संधी निर्माण करून दिली. नजमुल हुसेनने 101 चेंडूत 12 चौकारांसह 90 धावा जमविल्या तर शकीब 65 चेंडूत 12 चौकार, 2 षटकारांसह 82 धावा काढून बाद झाला. 2 बाद 210 अशी स्थिती असताना लवकरच बांगलादेशची स्थिती 7 बाद 269 अशी झाली होती. पण रहीम (10), तौहिद हृदय (नाबाद 15), तन्झिम साकिब (नाबाद 5) यांनी उपयुक्त धावा जोडत विजय साकार केला. लंकेच्या दिलशान मधुशंकाने 3, थीक्षना व मॅथ्यूज यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.

लंकेची खराब सुरुवात

प्रारंभी, बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर कुसल परेराला शोरिफूल इस्लामने पहिल्याच षटकांत बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. परेराने 4 धावा केल्या. यानंतर पथुन निसंका व कर्णधार कुशल मेंडिसने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी मैदानात स्थिरावली असे वाटत असताना मेंडिसला शकिब अल हसनने तंबूचा रस्ता दाखवला. तर पुढील षटकांत निसंकाला शोरिफूलने बाद केले. निसंकाने 8 चौकारासह 41 तर मेंडिसने 19 धावांचे योगदान दिले. यावेळी लंकेची 3 बाद 72 अशी स्थिती झाली होती.

असलंकाचे शानदार शतक

या बिकट स्थितीत समरविक्रमा व चरिथ असलंका यांनी चौथ्या गड्यासाठी 65 धावांची भागीदारी साकारली. या जोडीने एकेरी दुहेरी धावावर भर देत संघाचे शतक फलकावर लावले. समरविक्रमाने 4 चौकारासह 42 धावा केल्या. शकिबने त्याची विकेट घेतली. समरविक्रमा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊटचा शिकार ठरला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाइमआऊट होणारा पहिला फलंदाज ठरला. समरविक्रमा बाद झाल्यानंतर मॅथ्यूजने निर्धारित वेळेत पुढच्या चेंडूचा सामना केला नाही. यामुळे एकही चेंडू न खेळता त्याला मैदानातून बाहेर पडावे लागले. यादरम्यान, असलंकाने मात्र एका बाजूने किल्ला लढवताना शानदार शतक झळकावले. त्याने 105 चेंडूत 6 चौकार व 5 षटकारासह 108 धावांची खेळी साकारली. असलंकाच्या या शानदार खेळीमुळे लंकन संघाला 279 धावापर्यत मजल मारता आली. धनजंय डी सिल्वा 34 व महेश थिक्षणा 22 धावा करत असलंकाला चांगली साथ दिली. इतर तळाच्या फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने लंकेचा डाव 49.3 षटकांत 279 धावांवर संपुष्टात आला.

बांगलादेशसाठी तंजीम हसन शकिबने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कर्णधार शकिब अल हसन आणि शोरिफूल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. मेहदी हसन मिराझने 1 विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 49.3 षटकांत सर्वबाद 279 (निसंका 41, कुसल मेंडिस 19, समरविक्रमा 41, असलंका 108, धनजंय डी सिल्वा 34, तंजीम हसन 80 धावांत 3 बळी, शकिब अल हसन व शोरिफूल इस्लाम प्रत्येकी दोन बळी).

बांगलादेश  41.1 षटकांत 7 बाद 282 : लिटन दास 22 चेंडूत 23, नजमुल शांतो 101 चेंडूत 90, शकीब हसन 65 चेंडूत 82, मेहमुदुल्लाह 23 चेंडूत 22, तौहिद नाबाद 15, अवांतर 23, मदुशंका 3-69, थीक्षना 2-44, मॅथ्यूज 2-35.

क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच टाईमआऊटचा बळी

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. मॅथ्यूजला स्ट्राईक घ्यायला वेळ लागला, त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शकीबने पंचांकडे दाद मागितली. नियमांनुसार, पंचांनी मॅथ्यूजला बाद दिले. पण, शकीबच्या या कृतीवर क्रीडा जगतातून टीका होत आहे.

नेमके काय झाले

बांगलादेशविरुद्ध लढतीत अँजेलो मॅथ्यूज एकही चेंडू न खेळता बाद झाला. टाईमआऊटमुळे मॅथ्यूजला बाद देण्यात आले. श्रीलंकेच्या डावातील 25 व्या षटकात शकिब हसन गोलंदाजी करत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने समरविक्रमाला बाद केले. यानंतर मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात येत होता. मात्र, त्याला खेळपट्टीवर पोहोचण्यात थोडा उशीर झाला. मॅथ्यूजच्या हेल्मेटची स्ट्रीप तुटली होती. यामुळे तो हेल्मेट बदलण्यासाठी थांबला. मॅथ्यूजने ड्रेसिंग रुममधून हेल्मेट मागवले. ज्यामुळे त्याला खेळपट्टीवर पोहोचण्यात 2 मिनिटे लागली आणि पुढचा चेंडू खेळण्यासाठी 3 मिनिटापेक्षा अधिक वेळ लागला. यामुळे शकिबने पंचाकडे बादची दाद मागितली. क्रिकेटच्या नियमांनुसार, पंचांनी त्याला बाद दिले.

शकिबने खिलाडूवृत्ती दाखवायला हवी होती

शकिबने पंचांकडे बादचे अपील केल्यानंतर मॅथ्यूजने तुटलेले हेल्मेट अंपायर आणि शकिबलाही दाखवले. हेल्मेट तुटल्यामुळे मैदानात येण्यास वेळ लागला. पण शकिबने आपला निर्णय बदलला नाही. त्यामुळे पंचांना त्याला बाद द्यावे लागले. अशाप्रकारे मॅथ्यूज हा टाईमआऊट होणारा पहिला फलंदाज ठरला. शकीबने खिलाडूवृत्ती दाखवून अपील माघारी घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया अनेक माजी क्रिकेटपटूंनी दिली आहे.

श्रीलंकेचा मॅथ्यूज इतिहासातील प्रथम ‘टाईमआऊट’ बळी

एक फलंदाज बाद झाल्यानंतर दोन मिनिटांच्या आत चेंडू खेळण्यासाठी सज्ज न झाल्याने श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याला बाद देण्यात आले. सोमवारच्य्या विश्वचषक सामन्यात हा अद्भूत प्रकार घडला. अशा प्रकारे मॅथ्यूज हा क्रेकेटच्या इतिहासातील प्रथम आंतरराष्ट्रीय ‘टाईमआऊट’ बळी ठरला आहे. हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

श्रीलंका फलंदाजी करत असताना सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात उतरला. एक फलंदाज बाद झाल्यानंतर नवा फलंदाज दोन मिनिटांच्या कालावधीत पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला पाहिजे, अन्यथा त्याला बाद दिले जावे, असा नियम आहे. मॅथ्यूज हा दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळाने मैदानात उतरला. त्यामुळे बांगलादेशने अपील केल्यानंतर त्याला पंचांनी बाद ठरविले आणि मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. आपल्या हेल्मेटची काही समस्या होती, म्हणून आपल्याला विलंब झाला, असे तो पंचांना व खेळाडूंना सांगताना आढळला. पण पंच मरायस इरास्मुस आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनी हे कारण स्वीकारले नाही. त्यामुळे मॅथ्यूजला माघारी परतावे लागले. अशा प्रकारे क्रिकेटच्या 146 वर्षाच्या क्रिकेट इतिहासात कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यातील तो प्रथम ‘समयबळी’ (टाईम आऊट) ठरला. तो नियमाच्या आधारे बाद झाला असल्याने कोणत्याही गोलंदाजाच्या नावावर हा बळी नोंद होणार नाही.  बांगलादेश संघाने अपील मागे घेतले असते तर मॅथ्यूजला खेळण्याची संधी मिळू शकली असती. पण बांगलादेशचा कर्णधार शकिबने तसे केले नाही.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#Sport
Next Article