For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशचा पाकिस्तानवर पहिला टी-20 मालिका विजय

06:38 AM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशचा पाकिस्तानवर पहिला टी 20 मालिका विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

सामनावीर जाकेर अलीच्या लढाऊ अर्धशतकामुळे बांगलादेशने आठ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानवर पहिला टी-20 मालिका विजय मिळवला. जाकेरने आक्रमक खेळ करत 48 चेंडूत पाच षटकारांसह 55 धावा फटकावल्या. यामुळे बांगलादेशला डळमळीत सुरुवातीनंतरही 133 धावा करता आल्या. 134 धावांचा पाठलाग करताना, पाकिस्तानचे सहा फलंदाज एक अंकी धावा करीत बाद झाले आणि फहीम अशरफने एकट्याने झुंज दिली. त्याने पहिले अर्धशतक झळववताना 50 धावा काढल्या. पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला, त्याने 32 चेंडूत 51 धावा काढल्या. तो बाद झाल्यामुळे संघाला विजयासाठी 13 धावा कमी पडल्या. अहमद दानियलने (17) शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि पाकिस्तानला आणखी एक आशेचा किरण दाखवला. पण मुस्तफिजूर रहमानच्या पुढच्याच चेंडूवर तो मिड-विकेटवर झेलबाद झाला आणि पाकिस्तानचा संघ 19.2 षटकांत 125 धावांवर गारद झाला. बांगलादेशने या मालिकेतील पहिला सामना सात विकेट्सने जिंकला होता.

सोमवारी बांगलादेशच्या राजधानीत विमान अपघातात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ दोन्ही संघ आणि अधिकाऱ्यांनी हातावर काळ्या पट्ट्या बांधून सामन्यापूर्वी एक मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली वाहिली.

Advertisement

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर बांगलादेशने पदार्पण करणाऱ्या अहमद दानियाल (2-23) आणि सलमान मिर्झा (2-17) यांच्या भेदक माऱ्यासमोर 4 बाद 25 अशी घसरण झाली. त्यांनी अचूक दिशा व टप्पा राखता बांगलादेशच्या फलंदाजांना जेरीस आणले. जाकर अलीने मेहदी हसनच्या साथीने समर्थपणे प्रतिकार करीत  दोघांनी पाचव्या विकेटसाठी 53 धावा जोडत बांगलादेशला सुस्थिती प्राप्त करून दिली. डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजने मेहदी हसनचा बळी घेत ही भागीदारी मोडली, त्याने 25 चेंडूत 33 धावा केल्या. 14 व्या षटकात बांगलादेशची धावसंख्या 5 बाद 81 अशी झाली. त्यानंतर जाकेरने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत 46 चेंडूत तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने अब्बास आफ्रिदीला लाँग-ऑन दिशेने षटकारही मारला. आफ्रिदीच्या एका संथ चेंडूवर तो डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला, आफ्रिदीने 37 धावांत 2 बळी मिळविले.

माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचे वेगवान गोलंदाज शोरीफुल इस्लाम (3-17), तन्झिम हसन (2-23) आणि ऑफस्पिनर महेदी हसन (2-25) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत पाकिस्तानला अडचणीत आणले. परंतु पाकिस्तानच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच अविचारी फटकेबाजी केली आणि 10 व्या षटकात 6 बाद 30 अशी त्यांची अवस्था झाली. सर्व सहा फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. नंतर बांगलादेशच्या आक्रमणाविरुद्ध फहीम अशरफने खंबीरपणे उभे राहून अशक्य विजयाची शक्यता निर्माण केली. खुशदिल शाह (13) आणि अब्बास आफ्रिदी (19) यांनी त्याला थोडीफार साथ दिली. अशरफने 31 चेंडूत आपले पहिले अर्धशतक झळकवताना लेगस्पिनर रिशाद हुसेनला लाँग ऑनवर षटकार खेचला. तथापि, रिशादने (1-42) पुढच्याच चेंडूवर त्याला त्रिफळाचीत केले आणि पाकिस्तानची सामना जिंकण्याची संधी संपुष्टात आली. तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकांत सर्व बाद 133 : परवेझ हुसेन इमॉन 13, जाकेर अली 48 चेंडूत 1 चौकार, 5 षटकारांसह 55, महेदी हसन 25 चेंडूत 33, सलमान मिर्झा 2-17, अहमद दानियल 2-23, अब्बास आफ्रिदी 2-37, फहीम अशरफ 1-20, मोहम्मद नवाझ 1-20.

पाकिस्तान 19.2 षटकांत सर्व बाद 125 : खुशदिल शहा 13, फहीम अशरफ 32 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांह 51, अब्बास आफ्रिदी 19, अहमद दानियल 17, शोरिफुल इस्लाम 3-17, तन्झिम हसन शकीब 2-23, महेदी हसन 2-25, मुस्तफिजूर रहमान 1-15.

Advertisement
Tags :

.