ईशान्येतील राज्यांवर बांगलादेशची वक्रदृष्टी
युनूसनी पाकला सोपविला वादग्रस्त नकाशा
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश आणि भारतादरम्यान पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. यावेळी अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस युनूस यांच्याकडून पाकिस्तानला देण्यात आलेल्या नकाशात भारतातील राज्यांना बांगलादेशचा हिस्सा म्हणून दाखविण्यात आले आहे. पाकिस्तानचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख जनरल साहिद शमशाद मिर्झा यांनी युनूस यांची भेट घेतली होती. यादरम्यान युनूस यांनी पाकिस्तानी जनरलला एक नकाशा प्रदान केला, यात आसाम आणि ईशान्येतील अन्य राज्यांना बांगलादेशचा हिस्सा म्हणून दाखविण्यात आले आहे.
यापूर्वीही आगळीक
मागील काही महिन्यांपासून युनूस हे सातत्याने भारताच्या ईशान्येच्या राज्यांचा उल्लेख करत राहिले आहेत. एप्रिल महिन्यात युनूस यांनी चीनचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी ‘भारताची 7 राज्ये, भारताचा पूर्व हिस्सा ते सर्व असे देश आहेत, जे समुद्रापासून दूर आहेत, त्यांच्याकडे समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग नाही’ अशी टिप्पणी केली होती. या क्षेत्रासाठी (बंगालचा उपसागर) आम्हीच समुद्राचे संरक्षक आहोत. यामुळे मोठ्या संधी खुल्या होतात, अशा स्थितीत चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊ शकतो असे वक्तव्यही युनूस यांनी केले होते.
पाकिस्तानशी वाढती जवळीक
मिर्झा यांनी युनूस यांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान बांगलादेशसोबत संबंध मजबूत करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. युनूस आणि मिर्झा यांच्यातील बैठकीत द्विपक्षीय संबंधांशी निगडित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. कराची आणि चितगावदरम्यान सागरी मार्ग सुरु आहे, तर ढाका-कराची हवाईमार्ग काही महिन्यांमध्येच सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे मिर्झा यांनी म्हटले आहे.