समुद्रमार्गे पोहोचलेल्या बांगलादेशींना परत पाठवू
ओडिशा सरकारने केले स्पष्ट : समुद्रमार्गे घुसखोरीची भीती
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
बांगलादेशात राजकीय उलथापालथ आणि धर्माच्या आधारावर अत्याचार होऊ लागल्याने मोठ्या संख्येत तेथील हिंदू भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. सीमेवर बीएसएफने हजारो हिंदूंना रोखले आहे. तर आता बांगलादेशातील हिंदू समुद्राच्या मार्गाने भारतात प्रवेश करू शकतात असा गुप्तचर संघटनेचे म्हणणे आहे. यावर ओडिशातील कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी बांगलादेशातून अद्याप कुणी समुद्रमार्गे राज्यात दाखल झाले नसल्याचा दावा केला आहे.
ओडिशात अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची ओळख पटवून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविले जाणार असल्याचे हरिचंदन यांनी सांगितले. भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि ओडिशा सागरी पोलीस विभाग बांगलादेशला लागून असलेल्या 480 किलोमीटर लांब सागरी सीमेवर त्रिस्तरीय सुरक्षा कायम ठेवून आहे.
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी तटरक्षक दल आणि ओडिशा सागरी पोलिसांना सागरी मार्गाने होणारे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्देश दिला आहे. बांगलादेशातील अलिकडच्या घडामोडींनंतर अशाप्रकारच्या घुसखोरीची कुठलीच घटना निदर्शनास आली नसल्याचे हरिचंदन यांनी सांगितले आहे.
काही बांगलादेशी नागरिक दीर्घकाळापासून ओडिशात राहत आहेत. राज्य सरकार त्यांचे दस्तऐवज म्हणजेच व्हिसा, वर्क परमिट किंवा राज्यात वास्तव्याच्या कुठल्याही वैध कारणाची पडताळणी करणार आहे. यात काहीही बेकायदेशीर आढळून आल्यास घुसखोरांना त्यांच्या मायदेशी परत पाठविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ओडिशाच्या 7 जिल्ह्यांमध्ये एकूण 3740 बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटविण्यात आली आहे. यातील 1649 बांगलादेशी घुसखोर केंद्रपाडा तर जगतसिंहपूर येथे 1,112 आणि मलकानगिरि येथे 655 बांगलादेशी घुसखोर अवैध वास्तव्य करून असल्याचे आढळून आले आहे.