बांगलादेश महिलांकडे सॅफ चॅम्पियनशिपचे जेतेपद
वृत्तसंस्था/काठमांडू
विद्यमान विजेत्या बांगलादेश महिला फुटबॉल संघाने पुन्हा एकदा सॅफ महिला चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावत आपले वर्चस्व अधोरेखित केले. येथे झालेल्या अंतिम लढतीत बांगलादेशने नेपाळ महिला संघाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने बाजी मारत यजमानांच्या आशेला धक्का दिला. या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याचे त्यांचे स्वप्न पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले. सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील त्यांचा हा एकूण सहावा पराभव होता.
या सामन्यातील पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. पण उत्तरार्धात 52 व्या मिनिटाला बांगलादेशने पहिले यश मिळविले. मोनिका चकमाने हा गोल नोंदवून बांगलादेशला आघाडीवर नेले. चार मिनिटानंतर नेपाळला अमिशा रायने बरोबरी साधून देणारा गोल नोंदवला. प्रीती रायने यासाठी तिला चेंडू पुरविला होता. या धक्क्यानंतर बांगलादेशने पुन्हा सावरत दुसरा गोल नोंदवत आघाडी घेतली. रितुपर्णाने बॉक्सच्या बाहेरून मारलेल्या अप्रतिम फटक्याने चेंडू थेट जाळ्यात जाऊन विसावला. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला.
या स्पर्धेत रितुपर्णाने चमकदार प्रदर्शन केले असून अंतिम लढतीतही तिचाच खेळ उठावदार झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांना अनेक संधी मिळाल्या होत्या. बांगलादेशच्या सबिता खातूनला तर एक सुवर्णसंधी मिळाली होती, पण ती तिला साधता आली नाही. नेपाळच्या अमिशालाही दहाव्या मिनिटाला गोलची संधी मिळाली होती. पण तिने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला.