बांगलादेश विजेता, भारत उपविजेता
इक्बाल हुसेन इमॉनला दुहेरी मुकुट
वृत्तसंस्था/ दुबई
रविवारी येथे झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या एसीसीच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद बांगलादेशने पुन्हा स्वत:कडे राखले. अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताचा 59 धावांनी पराभव केला. बांगलादेशच्या इक्बाल हुसेन इमॉनला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी मुकुट मिळाला.
या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशचा डाव 49.1 षटकात 198 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचा डाव 35.2 षटकात 139 धावांत समाप्त झाल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बांगलादेशच्या डावात रिझान हुसेनने 3 चौकारांसह 47, मोहम्मद शहिब जेम्सने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 40, फरिद हसनने 3 चौकारांसह 39, अब्रारने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20 आणि मारुफ म्रिदाने 1 चौकारासह नाबाद 11 धावा केल्या. बांगलादेशला 17 अवांतर धावा मिळाल्या. भारतातर्फे गुहा, चेतन, हार्दिक राज यांनी प्रत्येकी 2 तर किरण चोरमाले, के. पी. कार्तिकेय आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इक्बाल हुसेन इमॉन आणि हकिम यांच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय युवा संघाची फलंदाजी कोलमडली. संघातील एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार मोहम्मद अमानने 1 चौकारासह 26, हार्दिक राजने 3 चौकारांसह 24, कार्तिकेयने 2 चौकारांसह 21 आणि सिद्धार्थने 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. चेतन शर्माने 1 चौकारासह 10 धावा केल्या. भारताच्या डावात 14 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे इक्बाल हुसेन इमॉनने 24 धावांत 3, हकिमने 8 धावांत 3, फहादने 34 धावांत 2 आणि म्रिदा व रिझान हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बांगलादेशच्या इक्बाल हुसेन इमॉनने या स्पर्धेत एकूण 13 गडी बाद करत त्याने मालिकावीर आणि सामनावीर असा दुहेरी पुरस्कार पटकाविला. या सामन्यात बांगलादेशची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण भारताच्या तुलनेत दर्जेदार झाले. भारतीय संघातील महत्त्वाचे फलंदाज वैभव सूर्यवंशी केवळ 9 धावांवर तर म्हात्रे एका धावेवर बाद झाले.
संक्षिप्त धावफलक - बांगलादेश 49.1 षटकात सर्वबाद 198 (रिझान हुसेन 47, मोहम्मद जेम्स 40, अब्रार 20, हकिम 16, हसन 39, म्रिदा नाबाद 11, अवांतर 17, गुहा, चेतन, हार्दिक राज प्रत्येकी 2 बळी, चोरमाले, कार्तिकेय आणि म्हात्रे प्रत्येकी 1 बळी.