बांगलादेशचा विंडीजवर वनडे मालिका विजय
वृत्तसंस्था / मिरपूर (बांगलादेश)
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात फिरकी गोलंदाजांच्या जोरावर यजमान बांगलादेशने विंडीजचा 179 धावांनी दणदणीत पराभव करत ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. विंडीज विरुद्ध बांगलादेशचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे. 2024 मार्चनंतर बांगलादेशने पहिली वनडे मालिका जिंकली आहे. बांगलादेशच्या सौम्या सरकारला सामनावीर तर रिशाद हुसेनला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने 50 षटकात 8 बाद 296 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजीसमोर विंडीजचा डाव 30.1 षटकात 117 धावांत आटोपला.
बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या सैफ हसनने 72 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 80 धावा जमविताना सौम्या सरकार समवेत पहिल्या गड्यासाठी 25.2 षटकात 176 धावांची शतकी भागिदारी केली. सौम्या सरकारचे शतक केवळ 9 धावांनी हुकले. सरकारने 86 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह 91 धावा जमविल्या. रिदॉयने 44 चेंडूत 2 चौकारांसह 28 तर नजमुल हुसेन शांतोने 55 चेंडूत 3 षटकारासह 44 धावा केल्या. नुरूर हसनने 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 16 तर कर्णधार मेहदी हसन मिराजने 1 चौकारासह 17 धावा जमविल्या. विंडीजतर्फे अकिल हुसेनने 41 धावांत 4 तर अथांझेने 37 धावांत 2 तसेच चेस आणि मोती यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. विंडीजच्या अकिल हुसेनने आपल्या एका षटकात 3 गडी बाद केले. अकिल हुसेनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर विंडीजने या मालिकेतील दुसरा सामना जिंकून बांगलादेशची बरोबरी साधली होती.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रिशाद हुसेन, मेहदी हसन मिराज यांच्या फिरकी समोर विंडीजच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. पाचव्या षटकापासूनच त्यांच्या डावाला गळती लागली आणि त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. विंडीजचा निम्मा संघ 63 धावांत तंबूत परतला होता. अकिल हुसेनने 15 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 27 तर किंगने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18, अथांजेने 1 षटकारासह 15, ग्रिव्हेसने 15, रुदरफोर्डने 2 चौकारांसह 12, कार्टीने 15 धावा जमविल्या. फिरकी गोलंदाज रिशाद हुसेनने 54 धावांत 3 गडी बाद केले. या मालिकेत त्याने एकूण 12 बळी मिळविले. नेसुम अहमदने 11 धावांत 3 तर मेहदी हसन मिराज आणि तन्वीर इस्लाम यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश 50 षटकात 8 बाद 296 (सौम्या सरकार 91, सैफ हसन 80, रिदॉय 28, नजमुल हुसेन शांतो 44, मेहदी हसन मिराज 17, नुरूल हसन नाबाद 16, अवांतर 10, अकिल हुसेन 4-41, अथांजे 2-37, चेस आणि मोती प्रत्येकी 1 बळी), विंडीज 30.1 षटकात सर्वबाद 117 (अकिल हुसेन 27, किंग 18, अथांझे, कार्टी, ग्रिव्हेस प्रत्येकी 15 धावा, रुदरफोर्ड 12, रिशाद हुसेन व नेसुम अहमद प्रत्येकी 3 बळी, मेहदी हसन मिराज व तन्वीर इस्लाम प्रत्येकी 2 बळी).