भारतीय महिलांकडून बांगलादेशचा व्हाईटवॉश
टी-20 मालिकेत 5-0 फरकाने यश : राधा यादव सामनावीर व मालिकावीरची मानकरी
वृत्तसंस्था /सिल्हेट, बांगलादेश
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी साकारताना बांगलादेशचा त्यांच्या मायदेशात 5-0 असा दारुण पराभव केला. गुरुवारी झालेल्या पाचव्या व शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर 21 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 156 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 6 बाद 135 धावापर्यंत मजल मारता आली. संपूर्ण मालिकेत 10 बळी घेणाऱ्या राधा यादवला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. अखेरच्या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शेफाली वैद्य 2 चौकारासह 14 धावा काढून लवकर बाद झाली. यानंतर स्मृती मानधना व दयालन हेमलथा यांनी संघाचा डाव सावरला. स्मृतीने 25 चेंडूत 33 धावा केल्या तर हेमलथाने 28 चेंडूत 37 धावांचे योगदान दिले. स्मृती बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने झटपट 30 धावा केल्या. मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात हरमनप्रीत बाद झाली तर पाठोपाठ हेमलथालाही राबिया खानने आऊट केले. यानंतर रिचा घोषने 17 चेंडूत नाबाद 28 धावांची खेळी करत संघाला 156 धावापर्यंत मजल मारुन दिली. बांगलादेशकडून राबिया खान व नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मालिकावीर राधा यादवचा भेदक मारा
विजयासाठी 157 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला ठराविक अंतराने धक्के बसले. सलामीवीर दिलारा अख्तरला तिसऱ्याच षटकात राधा यादवने बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. यानंतर शोभना (13), रुबाया हैदर (20), कर्णधार निगार सुलताना (7) व शोरना अख्तर (1) झटपट बाद झाल्याने बांगलादेशची 5 बाद 52 अशी स्थिती झाली होती. या कठीण स्थितीत रितू मोनी व शोरिफा खातून यांनी सहाव्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण, रितू 37 धावांवर बाद झाल्यानंतर बांगलादेशला मोठा धक्का बसला. शोरिफाने नाबाद 28 तर रबिया खानने नाबाद 14 धावा केल्या. बांगलादेशला 20 षटकांत 6 बाद 135 धावा करता आल्या. टीम इंडियाने हा सामना 21 धावांनी जिंकत पाच सामन्यांची मालिका एकतर्फी जिंकली. राधा यादवने शानदार गोलंदाजी करताना 24 धावांत 3 गडी बाद केले तर आशा शोभनाने दोन गडी आऊट केले.
संक्षिप्त धावफलक :
भारत 20 षटकांत 5 बाद 156 (स्मृती मानधना 33, दयालन हेमलता 37, हरमनप्रीत कौर 30, रिचा घोष नाबाद 28, रबिया खान व नाहिदा अख्तर प्रत्येकी दोन बळी). बांगलादेश 20 षटकांत 6 बाद 135 (रुबाया हैदर 20, रितू मोनी 37, शोरिफा खातून नाबाद 28, रबिया खान नाबाद 14, राधा यादव 3-24).