बांगलादेशात वर्षानंतर होणार निवडणूक
अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांची माहिती
वृत्तसंस्था / ढाका
बांगला देशात 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या प्रारंभी सार्वत्रिक निवडणूक होईल, अशी घोषणा त्या देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी केली आहे. ही घोषणा त्यांनी सोमवारी टीव्हीवरुन देशाला दिलेल्या संदेशात केली आहे. निवडणुकीच्या विलंबाचे कारण स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देशाच्या सज्जतेसाठी एवढा वेळ लागणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
लवकरात लवकर निवडणुकीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन अंतरिम सरकारने सर्व राजकीय पक्षांना केले आहे. तथापि, मतदारसूची अद्ययावत करण्यासाठी आणि देशात सर्वंकष सुधारणांचा कार्यक्रम लागू करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. सर्व राजकीय पक्ष सज्ज असतील आणि मतदारसूची अद्ययावत करण्याचे काम लवकर पूर्ण झाले, तसेच व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे काम पूर्ण झाले, तर 2025 च्या शेवटी निवडणूक होऊ शकेल. मात्र, ही कामे पूर्ण न झाल्यास निवडणूक 2026 च्या पूर्वार्धात घ्यावी लागेल. निवडणूक सुरळीतपणे पार पडावी अशी अंतरिम सरकारची इच्छा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रथमच निवडणुकीची भाषा
5 ऑगस्टला बांगला देशात शेख हसीना यांचे सरकार पदच्युत करण्या आले. त्यानंतर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली. या सरकारने सोमवारी प्रथमच निवडणुकीची भाषा केली. निवडणूक टाळण्याचा आमचा विचार नाही. मात्र, तयारीसाठी वेळ लागणार असल्याचे ती घेण्यासाठी आणखी किमान 12 महिन्यांचा अवधी लागेल. त्याआधी निवडणूक घेणे शक्य होणार नाही, अशी भूमिका त्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केली आहे.