झाकिर नाईकला प्रवेश नाकारणार बांगलादेश
भारताच्या दबावाला यश
► वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारतीय वंशाचा कट्टरवादी धार्मिक उपदेशक झाकिर नाईकला देशात प्रवेशाची अनुमती न देण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश गृह मंत्रालयात पार पडलेल्या कायदा-सुव्यवस्था कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत झाकिर नाईकच्या संभाव्य दौऱ्यावर विस्तृत चर्चा झाल्याचे समजते.
झाकिर नाईक बांगलादेशात पोहोचल्यास मोठी गर्दी जमा होऊ शकते. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मोठ्या संख्येत पोलिसांना तैनात करावे लागेल. सद्यस्थितीत मोठ्या संख्येत पोलीस तैनात करणे शक्य नसल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले. बैठकीचे अध्यक्षत्व गृह विषयक सल्लागार लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) मोहम्मद जाहंगरी आलम चौधरी यांनी पेल. नोव्हेंबरच्या अखेरीस झाकिर नाईकला बांगलादेशात कार्यक्रमासाठी बोलाविण्याची योजना असल्याची घोषणा अलिकडेच स्पार्क इव्हेंट मॅनेजमेंट नावाच्या कंपनीने केली होती. स्पार्क इव्हेंट मॅनेजमेंट डॉ. झाकिर नाईक बांगलादेश टूर 2025 साठी अधिकृत आयोजक आहे. हा कार्यक्रम बांगलादेश सरकारची अनुमती आणि संबंधित प्राधिकरणांच्या सहकार्याने आयोजित केला जात असल्याचा दावा कंपनीने केला होता.
झाकिर नाईकच्या संभाव्य बांगलादेश दौऱ्याबद्दल भारतीय विदेश मंत्रालयाकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. याची दखल बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाने घेतली होती. भारतासह अन्य कुठल्याही देशाने अन्य देशाच आरोपी किंवा फरार व्यक्तीला शरण देऊ नये असे बांगलादेश विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते एस.एम. महबूबुल आलम यांनी म्हटले होते.
झाकिर नाईक भारतासाठी वाँटेड
भारतात दहशतवाद फैलावण्याचा आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये सामील असल्याचा आरोप झाकिर नाईकवर आहे. झाकिर हा 2016 पासून मलेशियात वास्तव्यास आहे. भारत सरकारने झाकिरची संघटना इस्लामिक रिसर्च फौंडेशनवरही बंदी घातली आहे. झाकिर ज्या देशात जाईल, तेथे त्याच्या विरोधात कारवाई होईल अशी भारत अपेक्षा करतो. झाकिर एक फरार गुन्हेगार असून भारतात वॉन्टेड आहे. याचमुळे संबंधित देश त्याच्या विरोधात योग्य कारवाई करतील आणि आमच्या सुरक्षा चिंतांचा विचार करतील अशी अपेक्षा असल्याचे भारताच्या विदेश मंत्रालयाने म्हटले होते.