बांगलादेश कसोटी संघ जाहीर
शकीब अल हसनची शेवटची कसोटी
वृत्तसंस्था/ढाका
द. आफ्रिका संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट मंडळाने संघाची घोषणा केली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी गुरुवारी संघ निवड जाहीर केली. दरम्यान, बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून त्याचा हा शेवटचा कसोटी सामना असेल. बांगलादेशच्या क्रिकेट निवड समितीने या आगामी कसोटी मालिकेसाठी संघ निवड करताना शकीब अल हसनला संघात स्थान दिले आहे. या मालिकेत शकीब अल हसनला निरोप दिला जाणार आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने शकीब अल हसनला संघात निवड करण्यासाठी परवानगी दिली आहे.
शकीब अल हसनने माय देशातीलच कसोटी सामन्यात निवृत्त होण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. दरम्यान बांगलादेश क्रिकेट मंडळाने शकीबची ही अट मान्य केली आहे. बांगलादेश संघामध्ये आता ताजुल इस्लाम, मेहदी हसन मिराज, नईम हसन व शकीब अल हसन हे चार फिरकी गोलंदाज राहतील. नजमुल हुसेन शांतोकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 21 ऑक्टोबरपासून मिरपूर येथे तर दुसरी कसोटी 29 ऑक्टोबरपासून चेतोग्राम येथे होणार आहे. बांलागदेश संघाला विंडीजचा सिमॉन्स नवीन प्रशिक्षक लाभला आहे. बांगलादेश संघाने अलिकडेच पाकचा त्यांच्या भूमीत 2-0 असा कसोटी मालिकेत फडशा पाडला होता.