भारतीय कनिष्ठ तिरंदाजांना एकूण 9 पदके
आशिया चषक तिरंदाजी 2 : पाच प्रकारांत रौप्यपदके
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताच्या कनिष्ठ तिरंदाजांनी येथे झालेल्या आशिया चषक दुसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी स्पर्धेत एकूण 9 पदकांची कमाई केली. भारतीय तिरंदाजांनी पाच प्रकारांत अंतिम फेरी गाठली होती. पण त्यांना सुवर्ण मिळविण्यात अपयश आल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताने एकूण 2 सुवर्ण, 6 रौप्य व एक कांस्यपदक मिळविले.
वरवर पाहता हा यशस्वी प्रवास वाटत असला तरी सखोल विचार केल्यास पुन्हा एकदा नकोसा ट्रेंड अधोरेखित झाला आहे. तो म्हणजे सर्वात महत्त्वाच्या वेळी भारतीय तिरंदाज डळमळीत होतात. रिकर्व्ह व कंपाऊंड या दोन्ही विभागात मिळून भारताने 10 पैकी 7 प्रकारांत अंतिम फेरी गाठली होती. पण त्यापैकी फक्त दोनमध्ये सुवर्णपदक पटकावण्यात त्यांना यश आले. उर्वरित पाचमध्ये मात्र भारतीय तिरंदाज दडपणाखाली कोसळल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पराभूत होणे फार महत्त्वाचे नव्हते, पण ते ज्या पद्धतीने पराभूत ते जास्त झोंबणारे होते. अग्रमानांकित असूनही खालचे मानांकन असलेल्या खेळाडूंकडून त्यांना पराभूत व्हावे लागले आहे. रिकर्व्ह हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असल्याने त्यातीय अपयश चिंताजनक आहे. भारताला या प्रकारात अजूनही एकदाही सुवर्ण मिळविता आलेले नाही. दोन सांघिक रौप्यव्यतिरिक्त रिकर्व्ह तिरंदाजांना रिकाम्या हातीच परतावे लागले आहे.
पुरुष रिकर्व्ह संघाला अंतिम फेरीत जपानकडून 6-0 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. हाच प्रकार मिश्र सांघिक रिकर्व्हमध्ये घडला. चौथ्या मानांकित विष्णू चौधरी व वैष्णवी पवार यांना इंडोनेशियाविरुद्ध 32-35 असा पराभव स्वाrकारावा लागला. महिला रिकर्व्ह टीमला व वैयक्तिक प्रकारात पदकाची फेरीही गाठता आली नाही.
कंपाऊंड प्रकारात भारताने दोन सुवर्णपदके मिळविली. कुशल दलालने ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ मॅननचा 149-143 असा पराभव केला तर याच प्रकारात सचिन छेचीने हिमू बच्छरचा 148-146 असा पराभव करून कांस्य मिळविले. महिला विभागात दोन भारतीयांनी अंतिम फेरी गाठली होती, त्यामुळे सुवर्ण निश्चित झाले होते. तेजल साळवेने षन्मुखी नागा साई बुद्देचा 146-144 असा पराभव करून सुवर्ण घेतले तर षन्मुखीला रौप्य मिळाले.
पुरुष सांघिक कंपाऊंडमध्ये अग्रमानांकित भारताला तिसऱ्या मानांकित कझाकने 231-235 असे चकित केले तर महिला कंपाऊंड संघाला मलेशियाकडून 232-232 अशी बरोबरी झाल्यानंतर शूटऑफमध्ये पराभव पत्करावा लागला. शूटऑफमध्ये भारताने 26-29 असे गुण नोंदवले. मिश्र सांघिक कंपाऊंड विभागात षन्मुखी व दलाल यांना कझाकच्या खेळाडूंकडून हार पत्करावी लागली. भारतीय जोडीने 78-77 अशी आघाडी घेतली होती. पण अखेर शूटऑफमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.