बांगलादेशाने संत्री आयात शुल्कात केली पहिल्यांदाच कपात
बांगलादेशी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाची घेतली दखल
नागपूर
बांगलादेशकडून सातत्याने आयात शुल्कात वाढ करण्यात आली. याचा फटका बांगलादेशमधील व्यापाऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे अस्वस्थ बांगलादेशी व्यापाऱ्यांनी तेथील सरकारविरोधात आंदोलन केले आहे. त्याची दखल घेत बांगलादेश सरकारकडून आयातशुल्कात पहिल्यांदाच अल्पशी कपात करण्यात आली. रंग आणि चवीच्या बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या नागपुरी संत्र्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
जगात आंबिया आणि मृग असे दोन बहार घेता येणारे हे एकमेव वाण आहे. मात्र बियांचे प्रमाण अधिक असल्याने प्रक्रियेत अडचणी आहेत, असे असले तरी टेबल फ्रुट म्हणून याला सर्वदूर मागणी आहे. बांगलादेश देखील नागपुरी संत्र्याचा मोठा खरेदी करणार आहे. एकूण दहा लाख टनांपैकी सुमारे दीड लाख टन नागपुरी संत्र्यांची बांगलादेशची मागणी राहते.
बेनापोल, मेहंदीपूर, गुजाडांगा, बनगाव या चार मुख्य सीमांवरून संत्रा बांगलादेशात पोहोचतो. परंतु गेल्या काही वर्षात बांगलादेशाकडून संत्र्यावरील आयात शुल्कात सातत्याने वाढ करण्यात आली. त्याच्याच परिणामी भारतातून होणारी नागपुरी संत्र्याची निर्यात सर्वाधिक प्रभावित झाली. हा माल देशांतर्गत बाजारपेठेत विकाव लागत असल्याने भारतातही संत्र्याचे दर दबावात आले. त्यामुळे संत्र्यावरील बांगलादेशीय आयत शुल्क कमी व्हावे, याकरिता राजकीय मुत्सद्देगिरीचा वापर केला जावा, अशी मागणी सातत्याने होत होती. परंतु बांगलादेश मधील नजीकच्या बदलत्या राजकीय अस्थिरतेने हे काम अधिकच कठीण झाले आहे. भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात होते. त्यावर निर्यात शुल्क वाढविण्यात आले होते. जशास तसे या धोरणांतर्गत बांगलादेशने संत्रा आयात शुल्कात वाढीवर भर दिला. त्यामुळेच तेथे कोणतीच राजकीय मुत्सद्देगिरीचा प्रभावी ठरत नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारंवार भाषणातून सांगतात. त्यामुळे संत्र्यावरील आयातशुल्क वाढीमागे हे देखील एक कारण सांगितले जाते.
शुल्क केले कमी
इंडो-बांगला ऑरेंज असोसिएशनचे अध्यक्ष सोनू खान यांच्या माहितीनुसार, ३० टन संत्र्यावर सध्या ३१ लाख रुपये आयात शुल्कापोटी भरावे लागतात. पूर्वी ११६ टका बांगलादेशी चलन (८३.७ रुपये भारतीय) प्रति किलो असे आयात शुल्क होते. त्यात कपात करुन ते ११२ टका (८०.२१ रुपये भारतीय) किलो असे कमी केले आहे. त्यामुळे आता ३१ ऐवजी ३० लाख रुपये ३० टन संत्र्यावर आयात शुल्क चुकवावे लागेल.