For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश - न्यूझीलंड दुसरी कसोटी आजपासून

06:45 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश   न्यूझीलंड दुसरी कसोटी आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था/ मीरपूर

Advertisement

बांगलादेशची न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी आज बुधवारपासून सुरू होत असून बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुऊसिंघा यांना त्यांच्या खेळाडूंनी अतिआत्मविश्वास वा आत्मसंतुष्टतेपासून दूर राहावे असे वाटत असेल. कारण मालिकेतील या अंतिम कसोटीत त्यांना न्यूझीलंडविरुद्धचा पहिला मालिका विजय नोंदविण्याची संधी चालून आलेली आहे. बांगलादेशने सिल्हेटमधील पहिली कसोटी 150 धावांनी जिंकली होती.

आतापर्यंत वरिष्ठ स्तरावरील झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोनच संघांविरुद्धच्या कसोटी मालिका बांगलादेशने जिंकलेल्या आहेत. ‘मला संघात आत्मसंतुष्टता दिसत नाही. तशी कोणतीही चिन्हे दिसल्यास प्रत्येक खेळाडूंशी मी बातचित करेन’, असे कसोटी सामन्याच्या आदल्या दिवशी बोलताना हथुऊसिंघा यांनी सांगितले. ‘आम्ही काल ड्रेसिंग रूममध्ये छान गप्पा मारल्या. मुशफिकुर रहीम आणि मोमिनुल हकसारखे मजबूत आणि अनुभवी खेळाडू खूप भावूकपणे बोलले. ते बंगालीमध्ये बोलले. पण ड्रेसिंग रूममध्ये आत्मसंतुष्ट असा कोणताही खेळाडू नाही’, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

सिल्हेट येथील कसोटी विजय हा बांगलादेशचा न्यूझीलंडविऊद्धच्या 18 सामन्यांमधील फक्त दुसरा विजय होता आणि तो कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या दुसऱ्या डावातील शतकाच्या बळावर नोंदला गेला. कर्णधार म्हणून पदार्पणातच शतक झळकविणारा शांतो हा पहिला बांगलादेशी क्रिकेटपटू ठरला आहे. ‘कर्णधार आणि नेतृत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शांतोने कर्णधारपद उत्कृष्टरीत्या सांभाळले. त्याचे डावपेच अचूक होते. त्याने क्षेत्ररक्षकांचीही खूप प्रभावीरीत्या मांडणी केली. कधी कधी ही मांडणी अपारंपरिक असली, तरी खूप प्रभावी राहिली. शिवाय त्याने नेतृत्वास साजेशी कामगिरी केली’, असे हथुरुसिंघा यांनी सांगितले.

डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लाम, ज्याने पहिल्या कसोटीत 184 धावा देऊन 10 बळी घेतले तो मीरपूरमध्ये बांगलादेशसाठी सर्वांत महत्त्वाचे शस्त्र असेल. मीरपूरमधील खेळपट्टी ही नेहमी संथ राहिली व त्यावर चेंडू किती उसळेल हे सांगता येत नसते. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदी म्हणाला की,, बांगलादेशविऊद्धची मालिका गमावण्याचा प्रसंग टाळायचा असेल तर संघाच्या फिरकीपटूंनी अधिक सातत्य दाखवण्याची गरज आहे. बांगलादेशच्या फिरकीपटूंनी 2.48 च्या सरासरीने 18 बळी घेतले, तर न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी 3.73 च्या सरासरीने 14 बळी घेतले. न्यूझीलंडचे आघाडीचे फिरकीपटू एजाज पटेल आणि ईश सोधी यांचा या पहिल्या सामन्यात मर्यादित प्रभाव दिसून आला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी संघात रचिन रवींद्र आणि मिचेल सँटनर यांचा समावेश केला जाऊ शकतो.

Advertisement
Tags :

.