बांगलादेशची मालिकेत विजयी सलामी
पहिली वनडे लढत : विंडीजचा 74 धावांनी पराभव
वृत्तसंस्था/ मिरपूर (बांगला देश)
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान बांगलादेशने विंडीजचा पहिल्या सामन्यात 74 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज आणि ‘सामनावीर’ रिशाद हुसेनने 35 धावांत सहा गडी बाद केले.
या पहिल्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशचा डाव 49.4 षटकात 207 धावात आटोपला. त्यानंतर विंडीजचा केवळ 39 षटकात 133 धावांत खुर्दा झाला.
बांगलादेशच्या डावामध्ये तौहिद रिदॉयने 90 चेंडूत 3 चौकारांसह 51, माहीदूल इस्लामने 76 चेंडूत 3 चौकारांसह 46, नजमूल हुसेन शांतोने 63 चेंडूत 3 चौकारांसह 32, रिशाद हुसेनने 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 26 धावा जमविल्या. नजमूल हुसेन आणि रिदॉय यांनी तिसऱ्या गड्यासाठी 71 धावांची भागिदारी केली. शांतो बाद झाल्यानंतर रिदॉय आणि माहीदूल इस्लाम यांनी चौथ्या गड्यासाठी 36 धावांची भर घातली. कर्णधार मेहदी हसन मिराजने 2 चौकारांसह 17 धावा जमवल्या. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे जेडेन सील्सने 48 धावात 3 गडी बाद केले तर चेस आणि ग्रिव्ह्ज यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. पियरी आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 10 षटकात 33 धावा जमविताना 2 गडी गमविले. रिदॉयने 87 चेंडूत 3 चौकारांसह अर्धशतक झळकवले. शेवटच्या 10 षटकात बांगलादेशने 67 धावा जमविताना 6 गडी गमविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रिशाद हुसेनच्या फिरकीसमोर विंडीजचे फलंदाज झटपट बाद झाले. विंडीजच्या डावात केवळ 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. किंग आणि अॅथनेझ या सलामीच्या जोडीने विंडीजच्या डावाला चांगली सुरुवात करून देताना 12 षटकात 51 धावांची भागिदारी केली होती. पण त्यानंतर विंडीजचा डाव कोलमडला. किंगने 60 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 44, अॅथनेझने 36 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 27, कर्णधार होपने 1 चौकारासह 15 तर ग्रिव्ह्जने 1 चौकारासह 12 धावा जमवल्या. बांगलादेशच्या फिरकीसमोर विंडीजची मधली फळी तसेच तळाचे फलंदाज लवकर बाद झाले. 39 षटकात विंडीजचा डाव 133 धावात आटोपला.
बांगलादेशतर्फे वनडे क्रिकेटमध्ये रिशाद हुसेनची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी म्हणजे 2006 साली केनियाविरुद्ध खेळताना बांगलादेशच्या मूर्तझाने 26 धावात 6 गडी बाद केले होते. विंडीजविरुद्धच्या या सामन्यात रिशाद हुसेनने उपयुक्त खेळी करताना 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकार ठोकल्याने बांगलादेशला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. रिशाद हुसेनने 9 षटकात 35 धावात 6 बळी घेतले. तर मुस्तफिजूर रेहमानने 16 धावात 2 तसेच टी इस्लाम व मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता उभय संघातील या मालिकेतील दुसरा सामना मंगळवार दि. 21 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल.
संक्षिप्त धावफलक - बांगलादेश - 49.4 षटकात सर्वबाद 207 (रिदॉय 51, एम इस्लाम 46, नजमूल हुसेन शांतो 32, रिशाद हुसेन 26, मेहदी हसन मिराज 17, सील्स 3-48, चेस व ग्रिव्ह्ज प्रत्येकी 2 बळी, पियरी, शेफर्ड प्रत्येकी 1 बळी), विंडीज- 39 षटकात सर्वबाद 133 (किंग 44, अॅथनेझ 27, होप 15, ग्रिव्ह्ज 12, रिशाद हुसेन 6-35, रेहमान 2-16, टी इस्लाम, मेहदी हसन मिराज प्रत्येकी 1 बळी).