बांगलादेशची झिम्बाब्वेवर 61 धावांची आघाडी
शदमन इस्लामचे शतक, तैजुल इस्लामचे 6 बळी
वृत्तसंस्था / चेतोग्राम
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत येथे सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर शदमन इस्लामच्या दमदार शतकामुळे यजमान बांगलादेशने झिम्बाब्वेवर 64 धावांची आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकल्याने बांगलादेशचा संघ मालिका बरोबरीसाठी झगडत आहे.
या दुसऱ्या कसोटीत झिम्बाब्वेने पहिल्या डावात 227 धावा जमविल्या. निक वेल्च आणि सिन विलियम्स यांनी दमदार अर्धशतके झळकविली. वेल्चने 133 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 54 तर विलियम्सने 166 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 67 धावा झळकविल्या. बेनेटने 5 चौकारांसह 21 तर बेन करेनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 धावा केल्या. सिगाने 2 चौकारांसह नाबाद 18 धावा जमविल्या. वेल्च आणि विलियम्स यांनी दुसऱ्या गड्यासाठी 90 धावांची भागिदारी केली. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लाम सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 60 धावांत 6 तर नईम हसनने 42 धावांत 2 गडी बाद केले.
झिम्बाब्वेने 9 बाद 227 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा शेवटचा गडी एकाही धावाची भर न घालता तंबुत परतला. त्यानंतर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरू केली. उपाहारापर्यंत बांगलादेशने 26 षटकात बिनबाद 105 धावा जमविल्या. शदमन इस्लाम आणि अनामुल हक यांनी सलामीच्या गड्यासाठी 31.3 षटकात 118 धावांची भागिदारी केली. अनामुल हकने 80 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर मोमीनुल हक आणि शदमन इस्लाम यांनी दुसऱ्या गड्यासाठी 76 धावांची भर घातली. मोमीनुल हकने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 33 तर कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 23, मुश्फिकुर रहीमने 59 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 40 धावा जमविल्या. चहापानावेळी बांगलादेशची स्थिती 57 षटकात 3 बाद 205 अशी होती. खेळाच्या शेवटच्या सत्रात बांगलादेशने 4 गडी गमविताना 86 धावा जमविल्या. शदमन इस्लामने 142 चेंडूत 16 चौकारांसह शतक पूर्ण केले. तो 120 धावांवर पायचीत झाला. दिवसअखेर बांगलादेशने पहिल्या डावात 87 षटकात 7 बाद 291 धावा जमवित झिम्बाब्वेवर 64 धावांची आघाडी मिळविली आहे. झिम्बाब्वेतर्फे व्हिन्सेंट मासेकेसाने 44 धावांत 3 तर बेनेट, मुझारबनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: झिम्बाब्वे प. डाव 90.1 षटकात सर्वबाद 227 (वेल्च 54, विलियम्स 67, बेनेट 21, करेन 21, अवांतर 18, तैजुल इस्लाम 6-60, नईम हसन 2-42), बांगलादेश प. डाव 87 षटकात 7 बाद 291 (शदमन इस्लाम 120, अनामुल हक 39, मोमीनुल हक 33, मुश्फिकुर रहीम 40, शांतो 23, मिराज खेळत आहे 16, व्ही. मासेकेसा 3-44, मुझारबनी, बेनेट आणि वेलिंग्टन मासाकेझा प्रत्येकी 1 बळी)