बांगलादेशची पाकवर 94 धावांची आघाडी
पहिली कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे, रहीमचे द्विशतक हुकले
वृत्तसंस्था / रावळपिंडी
यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात येथे सुरू असलेली पहिली क्रिकेट कसोटी शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 565 धावांचा डोंगर उभा करुन पाकवर 117 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर पाकने दिवसअखेर दुसऱ्या डावात 1 बाद 23 धावा जमविल्या. पाकचा संघ अद्याप 94 धावांनी पिछाडीवर आहे. बांगलादेशच्या मुष्फीकर रहीमने 191 धावांची खेळी केली. त्याला मेहदी हसन मिराज, दास, मोमीनुल हक्क आणि शदमान इस्लाम यांची चांगली साथ लाभली.
या कसोटीत पाकने आपला पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला. या सामन्यामध्ये वारंवार पावसाचा अडथळा आल्याने बराच खेळ वाया गेला. बांगलादेशने 5 बाद 316 या धावसंख्येवरुन शनिवारी चौथ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. मुष्फीकर रहीम आणि लीटॉन दास या जोडीने सहाव्या गड्यासाठी 114 धावांची शतकी भागिदारी केली. दासने 78 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 55 धावा जमविल्या. नसीम शहाने त्याला झेलबाद केले. दास बाद झाल्यानंतर रहीमला मेहदी हसन मिराजने चांगली साथ दिली. या जोडीने सातव्या गड्यासाठी 196 धावांची भागिदारी केली. रहीमने 341 चेंडूत 1 षटकार आणि 22 चौकारांसह 191 धावा झळकविल्या. मोहम्मद अलीने त्याला झेलबाद केले. रहीमचे द्विशतक 9 धावांनी हुकले. तो बाद झाला त्यावेळी बांगलादेशची स्थिती 7 बाद 528 अशी भक्कम होती. मेहदी हसन मिराजने 6 चौकारांसह 77 तर शोरीफुल इस्लामने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. बांगलादेशचा पहिला डाव 167.3 षटकात 565 धावांवर आटोपला. बांगलादेशने पाकवर पहिल्या डावात 117 धावांची आघाडी मिळविली. पाकतर्फे नसीम शहाने 93 धावांत 3 तर खुर्रम शहजाद, मोहम्मद अली व शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 2 गडी तर आयुबने 1 गडी बाद केला.
117 धावांनी पिछाडीवर असलेल्या पाकने दुसऱ्या डावाला सावध सुरूवात केली. पण एस. इस्लामने सलामीच्या सईम आयुबला केवळ एका धावेवर झेल बाद केले. शफीक 12 तर कर्णधार शान मसुद 9 धावांवर खेळत असून पाकने 10 षटकात 1 बाद 23 धावा जमविल्या. ही कसोटी आता अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे.
या सामन्यातील खेळाच्या तिसऱ्या दिवशी पाकने फिरकी गोलंदाजाचा वापर करण्याची जरुरु होती, असे वैयक्तिक मत पाक संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अझहर मेहमूदने व्यक्त केले आहे. रावळपिंडीच्या खेळपट्टीवर बऱ्यापैकी गवत असल्याने पाकच्या कर्णधाराने फिरकी गोलंदाजांचा वापर केला असता तर त्याचा लाभ संघाला मिळू शकला असता. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना तसेच फिरकीलाही अनकुल असल्याचे जाणवले. पण बांगलादेशच्या फलंदाजांनी पाकच्या वेगवान गोलंदाजीसमोर टिच्चुन फलंदाजी केल्याने पाकला बांगलादेशचा डाव लवकर संपविता आला नाही, असेही अझहर मेहमुदने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
संक्षिप्त धावफलक पाक प. डाव: 113 षटकात 6 बाद 448 डाव घोषित, बांगलादेश प. डाव 167.3 षटकात सर्व बाद 565 (मुष्फीकर रहीम 191, शदमान इस्लाम 93, मोमीनुल हक्क 50, लिटॉन दास 56, मेहदी हसन मिराज 77, शोरीफुल इस्लाम 22, अवांतर 32, नसीम शहा 3-93, शाहीन आफ्रिदी, खुर्रम शेहजाद, मोहम्मद अली प्रत्येकी 2 बळी, सईम आयुब 1-34), पाक. दु. डाव 10 षटकात 1 बाद 23 (शफीक खेळत आहे 12, शान मसूद खेळत आहे 9, सईम आयुब 1, एस. इस्लाम 1-13)