बांगलादेशला 367 धावांची आघाडी
दुसरी कसोटी, टकेरचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था / मिरपूर
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशने आयर्लंडवर 367 धावांची भक्कम आघाडी मिळविली. बांगलादेशने दुसऱ्या डावात 1 बाद 156 धावा झळकविल्या. मेहमुदुल हसन जॉय आणि शदमान इस्लाम यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
या कसोटीत बांगलादेशने पहिल्या डावात 476 धावा जमविल्या. मुश्फिकर रहीम आणि लिटॉन दास यांनी शानदार शतके झळकविली. रहीमने 106 तर दासने 128 धावा जमविल्या. मोमिनुल्ल हक्कने 63 धावांचे योगदान दिले. मेहदी हसन मिराजने 47, मेहमुदुल हसन जॉयने 34, शदमान इस्लामने 35 धावा जमविल्या. आयर्लंडच्या मॅकब्रिनेने 109 धावांत 6 तर हंप्रेज आणि होये यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
आयर्लंडने 5 बाद 98 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्याखेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 265 धावांत आटोपला. टकेरने 7 चौकारांसह नाबाद 45, स्टिफन डुहेनीने 4 चौकारांसह 46, जॉर्डन निलने 9 चौकारांसह 49 धावा जमविल्या. कर्णधार बेलबिरेनीने 3 चौकारांसह 21, स्टर्लिंगने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 27 धावा जमविल्या. बांगलादेशने पहिल्या डावात आयर्लंडवर 211 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर बांगलादेशने आपल्या दुसऱ्या डावाला प्रारंभ केला आणि दिवसअखेर 37 षटकात 1 बाद 156 धावा केल्या. मेहमुदुल हसन जॉय आणि शदमान इस्लाम यांनी सलामीच्या गड्यासाठी 119 धावांची शतकी भागिदारी केली. मेहमुदुल हसनने 91 चेंडूत 6 चौकारांसह 60 तसेच शदमान इस्लामने 5 चौकारांसह नाबाद 69 आणि मोमिनुल्ल हकने 4 चौकारांसह 19 धावा जमविल्या. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून बांगलादेशची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश प. डाव सर्वबाद 476 (लिटॉन दास 128, मुश्फिकर रहीम 106, मोमिनुल्ल हक 63, मेहदी हसन मिराज 47, मेहमुदुल हसन जॉय 34, शदमान इस्लाम 35, अवांतर 14, मॅकब्रिने 6-109, हंप्रेज व होये प्रत्येकी 2 बळी). आयर्लंड प. डाव सर्वबाद 265 (टकेर नाबाद 75, डुहेनी 46, निल 49, स्टर्लिंग 27, बेलबिरेनी 21, टी. इस्लाम 4-76, अखिल अहमद व हसन मुरार प्रत्येकी 2 बळी, इमादोत हुसेन व मेहदी हसन मिराज प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश दु. डाव 37 षटकात 1 बाद 156 (मेहमुदुल हसन जॉय 60, शदमान इस्लाम खेळत आहे 69, मोमिनुल्ल हक खेळत आहे 19, होये 1-56).