बांगलादेशला112 धावांची आघाडी
कर्णधार नजमुल हुसेनचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था / सिलेत
सध्या झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर असून उभय संघात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशने झिम्बाब्वेवर 112 धावांची आघाडी मिळविली आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन 60 धावांवर खेळत आहे.
या पहिल्या कसोटीत बांगलादेशने पहिल्या डावात 191 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेने पहिल्या डावात 273 धावा जमवित 82 धावांची आघाडी घेतली. बांगलादेशच्या पहिल्या डावात मोमीनुल हक्कने शानदार अर्धशतक झळकविले. त्यानंतर झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात सलामीच्या बेनेट आणि विलियम्स यांनी अर्धशतके नोंदविली. बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने 52 धावांत 5 गडी बाद केले. 82 धावांनी पिछाडीवर असलेल्या बांगलादेशने 1 बाद 57 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. दरम्यान पावसाच्या अडथळ्यामुळे बराच खेळ वाया गेला. उपाहारापर्यंत खेळ होऊ शकला नाही. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बांगलादेशने चहापानाअखेर 4 बाद 155 धावा जमविल्या. मेहमुदुल हसन जॉयने 65 चेंडूत 6 चौकारांसह 33 धावा जमविताना मोमीनुल हक्क समवेत दुसऱ्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. मोमीनुल हक्कने 84 चेंडूत 6 चौकारांसह 47 धावा जमविल्या. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने दिवसअखेर 103 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 60 धावा जमविल्या. जाकरअली 3 चौकारांसह 21 धावांवर खेळत आहे. झिम्बाब्वेतर्फे मुझारबनीने 51 धावांत 3 गडी बाद केले. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी आहेत.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश प. डाव सर्वबाद 191, झिम्बाब्वे प. डाव सर्वबाद 273, बांगलादेश दु. डाव 57 षटकात 4 बाद 194 (नजमुल हुसेन शांतो खेळत आहे 60, जाकरअली खेळत आहे 21, मोमीनुल हक्क 47, मेहमुदुल हसन जॉय 33, मुजारबनी 3-51)