बांगला देशकडून भारताचा पुन्हा अवमान
1971 चे युद्ध भारताने नव्हे, आम्हीच जिंकल्याची दर्पोक्ती, सैनिक स्मारकाचाही अनादर
वृत्तसंस्था / ढाका
‘बांगला देशला स्वातंत्र्य भारतीय सैनिकांनी मिळवून दिले आहे. त्या देशाच्या मुक्ततेसाठी आमच्या सैनिकांचे रक्त सांडले आहे,’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर प्रसिद्ध केलेल्या संदेशावर बांगला देशने टीका केली आहे. हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 डिसेंबर या बांगला देश मुक्तीदिनाच्या निमित्ताने सोमवारी प्रसिद्ध केला होता. या संदेशाला आक्षेप घेताना बांगला देशने भारताचा उपमर्द करणारी भाषा उपयोगात आणल्याचे दिसून येत आहे.
बांगला देशची मुक्ती आमच्या पराक्रमाने झाली. भारताच्या सैनिकांनी ती करुन दिलेली नाही. 1971 च्या युद्धात भारत केवळ आमचा एक सहकारी देश होता. यापेक्षा अधिक भारताची कोणतीही भूमिका नव्हती, असा कांगावा बांगला देशचे गृहमंत्री असीफ नझरुल यांनी केला. या युद्धातील विजयाचे श्रेय भारताला घेता येणार नाही, अशी उपमर्दकारक टिप्पणीही यांनी त्यांच्या संदेशात केली आहे.
सत्तांतरानंतर हिंसाचार
5 ऑगस्टला बांगला देशात शेख हसीना यांना पदच्युत करण्यात आल्यानंतर त्या देशात पुन्हा दहशतवाद आणि कट्टर धर्मवादाने डोके वर काढले आहे. त्या देशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना या धर्मवादामुळे हिंसाचार आणि अत्याचारांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक हिंदू मंदिरांची मोडतोड करण्यात आली असून हिंदूंची 600 हून अधिक घरे जाळण्यात आली आहेत. बांगला देशातील इस्कॉन या संस्थेच्या माजी प्रमुखांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर देशद्रोहाचे प्रकरण नोंद करण्यात आले आहे. या सत्तांतरानंतर त्या देशातील शांतता आणि सौहार्द संपुष्टात आले असून भारताने तेथील हिंदूंसाठी संरक्षकाची भूमिका पार पाडावी, अशी मागणीही अनेकांकडून केली जात आहे.
1,600 सैनिकांने हौतात्म्य
पूर्वी पाकिस्तानचा भाग असणाऱ्या बांगला देशात पाकिस्तानी प्रशासन आणि सैन्याने अनन्वित अत्याचार केले होते. त्याला कंटाळून त्या देशातील अनेक नागरीकांनी भारतात स्थलांतर केले होते. तसेच बांगला देशमधील नागरीक त्या काळात भीतीच्या छायेखाली होते. तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानशी युद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर भारतीय सेनेने 15 दिवसांमध्ये पाकिस्तानचा पराभव करुन बांगला देशला मुक्ती मिळवून दिली होती. या युद्धात 1 हजार 600 भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. भारताने ही कृती केली नसती तर बांगला देशला स्वातंत्र्य मिळणे निव्वळ अशक्य होते. मात्र, आता बांगला देशची वाटचाल पुन्हा इस्लामी धर्मांधतेकडे होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भारताने त्या देशासाठी केलेल्या त्यागाचा आणि सांडलेल्या रक्ताचा अवमान त्या देशाकडून होत आहे. तो देश कृतघ्न बनला आहे, अशी टीका अनेक तज्ञांनी केली आहे.