हसीनांच्या प्रत्यार्पणाची बांगलादेशकडून मागणी
वर्षभरात तिसऱ्यांदा पत्र : भारताकडून अद्याप प्रतिसाद नाही
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पुन्हा एकदा माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाची विनंती करणारे अधिकृत पत्र भारताला पाठवले आहे. ही विनंती अंतरिम सरकारचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांनी केली आहे. सदर पत्र शुक्रवार 21 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयामार्फत भारताला पाठवण्यात आले. मात्र, भारताने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. बांगलादेशने यापूर्वी शेख हसीनांचे प्रत्यार्पण करण्याची विनंती करणारे पत्र दोनवेळा पाठवले होते. गेल्यावर्षी 20 आणि 27 डिसेंबर रोजी पत्रे पाठवण्यात आल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली.
बांगलादेशच्या लवादाने गेल्या आठवड्यातच शेख हसीना यांच्यासह त्यांच्या सरकारमधील माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांना मानवतेविरुद्धच्या गुह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. हा खटला त्यांच्या अनुपस्थितीत पार पडला. न्यायालयाने त्यांच्यावर पाच प्रकरणांमध्ये आरोप लावले होते.