बांगलादेश मोठ्या विजयाच्या समीप
आयर्लंडला 333 धावांचे कडवे आव्हान
वृत्तसंस्था / मिरपूर
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशकडून आयर्लंडला विजयासाठी 333 धावांचे कडवे आव्हान मिळाले असून आयर्लंडने दुसऱ्या डावात 6 बाद 176 धावा जमविल्याने बांगलादेशचा संघ आता मोठ्या विजयाच्या समीप पोहोचला आहे.
या कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव 476 धावांवर आटोपला. त्यानंतर आयर्लंडचा पहिला डाव 265 धावांत आटोपल्याने बांगलादेशने पहिल्या डावात आयर्लंडवर 211 धावांची भक्कम आघाडी मिळविली. बांगलादेशने उपलब्ध असूनही फॉलोऑन दिला नाही आणि त्यांनी 1 बाद 156 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी आपला दुसरा डाव 4 बाद 297 धावांवर घोषित केला. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात मेहमुदुल हसन जॉय, शदमान इस्लाम, मोमिनुल हक आणि मुश्फिकर रहीम यांनी अर्धशतके झळकविली. जॉय आणि शदमान इस्लाम यांनी सलामीच्या गड्यासाठी 119 धावांची शतकी भागिदारी केली. जॉयने 91 चेंडूत 6 चौकारांसह 60 धावा जमविल्या. शदमान इस्लामने 119 चेंडूत 7 चौकारांसह 78 धावा केल्या. मोमिनुल हकने 118 चेंडूत 10 चौकारांसह 87 धावा झोडपल्या. कर्णधार नजमुल हुसेन शांतो केवळ 1 धावेवर बाद झाला. मुश्फिकर रहीमने 81 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 93 धावा झळकविल्या. उपाहारानंतर काही वेळातच बांगलादेशने आपला दुसरा डाव 4 बाद 297 धावांवर घोषित करुन आयर्लंडला निर्णायक विजयासाठी 509 धावांचे कठीण आव्हान दिले.
बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा दुसरा डावही कोलमडला. चहापानापर्यंत आयर्लंडची स्थिती 23 षटकात 3 बाद 88 अशी होती. कर्णधार बेलबिरेनी 2 चौकारांसह 13 धावांवर तर स्टर्लिंग 1 चौकारांसह 9 धावांवर बाद झाले. कार्मिचेलने 1 चौकारांसह 19 धावा जमविल्या. टेक्टरने 80 चेंडूत 7 चौकारांसह 50 धावा जमविल्या. टकेरने 4 तर डुहेनीने 1 षटकारासह 15 धावा केल्या. खेळाच्या शेवटच्या सत्रात आयर्लंडने आणखी तीन गडी गमविले. दिवसअखेर आयर्लंडने दुसऱ्या डावात 6 बाद 176 धावा जमविल्या. या कसोटीतील खेळाचा एक दिवस बाकी असून रविवारी बांगलादेशचा संघ मोठा विजय मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. आयर्लंडच्या दुसऱ्या डावात ताजुल इस्लामने 55 धावांत 3 तर हसन मुरादने 35 धावांत 2 तसेच खलीद अहमदने 24 धावांत 1 गडी बाद केला. या मालिकेतील पहिली कसोटी बांगलादेशने यापूर्वीच जिंकली असून आता बांगलादेशचा संघ ही मालिका एकतर्फी जिंकण्याच्या मार्गावर आहे.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश प. डाव सर्वबाद 476, आयर्लंड प. डाव सर्वबाद 265, बांगलादेश दु. डाव 4 बाद 297 डाव घोषित (मोमिनुल हक 87, शदमान इस्लाम 78, जॉय 60, मुश्फिकर रहीम 53), आयर्लंड दु. डाव 6 बाद 176 (टेक्टर 50, कॅम्पफर खेळत आहे 34, डुहेनी 15, ताजुल इस्लाम 3-55, हसन मुराद 2-35, खलिद अहमद 1-23).