नेपाळला नमवत बांगलादेश सुपर-8 मध्ये
21 धावांनी विजयी : सामनावीर तंझिम हसनचे अवघ्या 7 धावांत 4 बळी
वृत्तसंस्था/ सेंट व्हिन्सेंट
किंग्सटाऊनच्या अर्नोस वेल मैदानावर झालेल्या सामन्यात बांगलादेशने नेपाळचा 21 धावांनी पराभव केला. नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला केवळ 106 धावांवरच रोखले. नेपाळला मात्र माफक लक्ष्य प्राप्ती करता आली नाही आणि 21 धावांनी हा सामना बांगलादेशने जिंकला. नेपाळ केवळ 85 धावा करू शकला. बांगलादेशसाठी तंझिम हसन शाकिबने अवघ्या 7 धावांत 4 बळी घेतले. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह बांगलादेशचा संघ सुपर 8 साठी पात्र ठरला आहे. सुपर 8 मध्ये बांगलादेश गट 1 मध्ये असून, या गटात भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत.
नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने अवघ्या 30 धावांत 4 विकेट गमावल्या. सलामीवीर तंझिम हसनला भोपळाही फोडता आला नाही. लिटन दास, कर्णधार शांतो व तौहिद ह्य्दय हे स्टार फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अनुभवी शकिब अल हसनलाही (10 धावा) प्रभावी कामगिरी करता आली नाही. याशिवाय, मेहमुदुल्लाहने 12, जाकीर अली 12, रिशाद हुसेन 12 तर तस्कीन अहमदने 12 धावा केल्या. नेपाळच्या गोलंदाजासमोर टॉप ऑर्डरपासून मिडल ऑर्डरपर्यंत बांगलादेशचे सगळेच फलंदाज फ्लॉप ठरले. 19.3 षटकांत 106 धावांवर बांगलादेशचा संघ ऑलआऊट झाला.
107 धावांचा पाठलाग करताना नेपाळने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. नेपाळचा निम्मा संघ केवळ 26 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर कुशल मल्ला आणि दीपेंद्र सिंग ऐरी यांनी सहाव्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी करून कमबॅक केले. मल्लाने 27 तर दीपेंद्रने 25 धावा केल्या. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर नेपाळचा पराभव निश्चित झाला. इतर तळाच्या फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम केल्याने नेपाळचा डाव 19.2 षटकांत 85 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून तंझिम हसनने सर्वाधिक 7 धावांत 4 बळी घेत विजयात मोलाची भूमिका बजावली.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 19.3 षटकांत सर्वबाद 106 (लिटन दास 10, शकिब अल हसन 17, मेहमुदुल्लाह 13, रिशाद हुसेन 13, दीपेंद्र सिंग, रोहित पौडेल, संदीप लामिछने प्रत्येकी दोन बळी).
नेपाळ 19.2 षटकांत सर्वबाद 85 (कुशल मल्ला 27, दीपेंद्र सिंग 25, आसिफ शेख 17, तंझिम हसन 7 धावांत 4 बळी, रेहमान 3 तर शकिब हसन 2 बळी).
बांगलादेशच्या तंझिम हसनचा अनोखा विक्रम
नेपाळविरुद्ध सामन्यात तंझिम हसन शाकिबने 4 षटकांत केवळ 7 धावा देत 4 महत्त्वाचे बळी घेतले. त्याने तब्बल 21 डॉट बॉल टाकले. टी-20 सामन्यात एक गोलंदाज 24 चेंडू टाकू शकतो, त्यापैकी तंजीमने 21 डॉट बॉल टाकले. टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा तो गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, कोणत्याही गोलंदाजाने टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात 20 पेक्षा जास्त डॉट बॉल टाकले नव्हते.
नेपाळ-बांगलादेश सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा
नेपाळ व बांगलादेश यांच्यातील सामना सोमवारी सेंट व्हिन्सेंट येथे खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलचा बांगलादेशचा युवा गोलंदाज तंझीम हसनसोबत वाद झाला. तंझीमने नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की केली आणि दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. तंझीम बांगलादेशसाठी डावातील तिसरं षटक टाकण्यासाठी आला. षटक पूर्ण होताच त्याची आणि नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल यांच्यात बाचाबाची झाली. दोघे एकमेकांना काहीतरी उद्देशून बोलले आणि त्यानंतर तंझीमने रोहितजवळ येऊन त्याच्याशी धक्काबुक्की केली. दरम्यान, बांगलादेशचे खेळाडू आणि पंचांनी हस्तक्षेप करुन प्रकरण शांत केले