बांगलादेशचा लंकेवर 83 धावांनी विजय
टी-20 मालिका, लिटॉन दास ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / डंबुला
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बांगलादेशने येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान लंकेचा 83 धावांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. 50 चेंडूत 76 धावा झळकविणाऱ्या कर्णधार लिटॉन दासला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील पहिला सामना लंकेने जिंकून बरोबरी साधली होती. या दुसऱ्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 20 षटकात 7 बाद 177 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेचा डाव 15.2 षटकात 94 धावांत आटोपला.
बांगलादेशच्या डावामध्ये कर्णधार लिटॉन दासने 50 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारांसह 76, रिदॉयने 25 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 31 तर शमीम हुसेनने 27 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 48 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 8 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 39 धावा जमविताना 2 गडी गमविले. दासने अर्धशतक 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 39 चेंडूत पूर्ण केले. लंकेतर्फे बिनुरा फर्नांडोने 31 धावांत 3 तर तुषारा आणि तिक्ष्णा प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात सलामीच्या निशांकाने 29 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 32 तर शनाकाने 16 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. लंकेच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. बांगलादेशतर्फे रिशाद हुसेनने 18 धावांत 3 तर एस. इस्लाम आणि सैफुद्दीन यांनी प्रत्येकी 2 तर रेहमान व मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश 20 षटकात 7 बाद 177 (लिटॉन दास 76, शमीम हुसेन 48, रिदॉय 31, बिनुरा फर्नांडो 3-31, तुषारा व तिक्ष्णा प्रत्येकी 1 बळी), लंका 15.2 षटकात सर्वबाद 94 (निशांका 32, शनाका 20, रिशाद हुसेन 3-18, एस. इस्लाम व सैफुद्दीन प्रत्येकी 2 बळी, रेहमान व मेहदी हसन मिराज प्रत्येकी 1 बळी)