For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या कसोटीत बांगलादेशने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा

06:55 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या कसोटीत बांगलादेशने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा
Advertisement

न्यूझीलंडचा 150 धावांनी केला पराभव : तैजुल इस्लामचे सामन्यात 10 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ सिल्हेट, बांगलादेश

नुकत्याच झालेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळणाऱ्या बांगलादेशने उपांत्य फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंडला सिल्हेट कसोटीत हरवण्याची किमया केली. दोन्ही डावात 10 विकेट्स पटकावणारा तैजुल इस्लाम बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कसोटीच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी बांगलादेशला विजयासाठी 3 विकेट्सची आवश्यकता होती. गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत दीड तासात संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. या विजयासह यजमान बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून मिरपूर येथे खेळवण्यात येईल.

Advertisement

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 310 धावा केल्या होत्या. यानंतर खेळताना पाहुण्या किवीज संघाचा पहिला डाव 317 धावांत आटोपला व त्यांना 7 धावांची किरकोळ आघाडी मिळाली. पहिल्या डावात अवघ्या 7 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर बांगलादेशचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांच्यासमोर कठीण लक्ष्य ठेवण्याचे आव्हान होते. अशा स्थितीत कर्णधार शांतोने 105 धावांची दमदार खेळी केली. शांतोशिवाय मुशफिकुर रहीमने 67 धावा आणि मेहदी हसन मिराजच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या डावात 338 धावा केल्या आणि न्यूझीलंडला 332 धावांचे लक्ष्य मिळाले.

विजयी आव्हानाचा पाठलाग करताना किवीज संघाने चौथ्या दिवसअखेरीस 7 गडी गमावत 113 धावा केल्या होत्या. सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 219 धावा करायच्या होत्या, तर बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी फक्त 3 विकेट्स हव्या होत्या. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच बांगलादेशच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पराभव केला. फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या आणि संपूर्ण संघ 71.1 षटकांत 181 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून तैजुल इस्लामने या डावात 6 बळी बाद केले. डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लामला या सामन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच‘ म्हणून निवडण्यात आले. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या. कर्णधार साऊदीने 34 तर ईश सोधीने 22 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 310 व दु.डाव 338. न्यूझीलंड प.डाव 317 व दु.डाव 71.1 षटकांत सर्वबाद 181 (डॅरेल मिचेल 58, ग्लेन फिलिप्स 12, ईश सोधी 22, टीम साऊदी 34, तैजुल 75 धावांत 6 बळी, नईम हसन 2 बळी).

23 महिन्यात बांगलादेशचा न्यूझीलंडला दुसऱ्यांदा धक्का

बांगलादेशचा न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत दुसरा विजय आहे. बांगलादेशने यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये माउंट मौनगानुई कसोटीत न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले होते. बांगलादेशने किवी संघाला कसोटी सामन्यात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. या ऐतिहासिक विजयानंतर मायदेशात देखील बांगलादेशनेही सिल्हेट कसोटीतही ऐतिहासिक विजयाची कहाणी लिहिली.

वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बांगलादेश दुसऱ्या स्थानी

वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सध्या पाकिस्तान प्रथम क्रमांकावर आहे. आता बांगलादेशने न्यूझीलंडचा पराभव करत गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशची विजयाची टक्केवारी 100 टक्के आहे. भारत 66 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 30 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे भारताचे गुण जास्त असूनही बांगलादेशनंतर तिसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement
Tags :

.