बांगलादेशची नेदरलँड्सवर मात
वृत्तसंस्था/ सेंट व्हिन्सेंट
आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने नेदरलँड्सवर 25 धावांनी विजय मिळवला. प्रारंभी, शकिब अल हसन आणि तंजिद हसनच्या फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने 20 षटकांत 5 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ 20 ओव्हरमध्ये 8 बाद 134 धावा करु शकला. या विजयासह बांगलादेशने सुपर-8 मधील आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. नाबाद 64 धावांची खेळी साकारणाऱ्या शकिब अल हसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नेदरलँड्सचा कॅप्टन स्कॉट एडवर्डने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने नेदरलँडला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले. बांगलादेशकडून शाकिब हसनने सर्वाधिक 64 धावा केल्या. तंजिद हसनने 35 तर मेहमुदुल्लाहने 25 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडने चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यांना ती लय कायम ठेवता आली नाही. विक्रमजीत सिंगने 26 तर सायब्रंटने 33 धावा केल्या. इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने नेदरलँडला 8 बाद 134 धावा करता आल्या. हा सामना बांगलादेशने 25 धावांनी जिंकला. दरम्यान, गट ड मधून दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 साठी क्वालिफाय केले आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी बांगलादेश आणि नेदरलँड्समध्ये शर्यत आहे. श्रीलंकेचा संघ सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर गेलेला आहे.