For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशची पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतावर मात

06:22 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशची पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतावर मात
Advertisement

यू-20 सॅफ फुटबॉल स्पर्धा : उपांत्य लढतीत बांगलादेश 4-3 फरकाने विजयी

Advertisement

वृत्तसंस्था/ काठमांडू

सॅफ 20 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारतीय फुटबॉल संघाला बांगलादेशविऊद्ध पेनल्टीवर 3-4 असा पराभव स्वीकारावा लागला. मध्यंतरावेळी 1-0 ने आघाडीवर असलेल्या बांगलादेशची बुधवारी अंतिम फेरीत यजमान नेपाळशी गाठ पडेल. बांगलादेशचा बदली गोलरक्षक मोहम्मद आसिफने दोन महत्त्वपूर्ण पेनल्टी वाचवल्यामुळे गतविजेत्या भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

Advertisement

दोन्ही संघांनी प्रशंसनीय बचाव दाखविला, परंतु पेनल्टी शूटआऊटमध्ये आसिफच्या गोलरक्षणाने सारा फरक घडवून आणला. त्यापूर्वी नियमित वेळेत असदुल इस्लाम साकिबने 36 व्या मिनिटाला बांगलादेशला आघाडी मिळवून दिली, तर कर्णधार रिकी मीतेई हाओबामने 74 व्या मिनिटाला गोल करून भारताला सामन्यात परत आणले. भारताने संयम आणि नियंत्रण दाखवत सामन्याची सुऊवात चांगल्या पद्धतीने केली होती. परंतु पुढे बांगलादेशचा बचाव दृढ होत गेला.

36 व्या मिनिटाला भारताने केलेल्या बचावातील चुकांचे भांडवल करून बांगलादेशने पहिले यश मिळवले. यावेळी डावीकडून मोहम्मद रब्बी होसेन राहुलने दिलेला क्रॉस गोलक्षेत्रात असदुल मोल्लाला मिळाला आणि त्याने गोलरक्षक प्रियांशला चकवून बांगलादेशला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रामध्ये भारताने बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. या सत्राच्या मध्यास बांगलादेशचा गोलरक्षक मेहेदी हसनला भारतीय खेळाडूसमवेत टक्कर झाल्याने मैदानाबाहेर जावे लागले आणि त्याच्या जागी मोहम्मद आसिफने स्थान मिळवले.

शेवटी, रिकी मीतेई हाओबामने बदली खेळाडू नाओबा मैतेई पांगम्बमकडून मिळालेल्या सुरेख पासवर बरोबरी साधली. शूटआऊटमध्ये, भारताची सुऊवात खराब झाली. कारण गंगटेचा फटका आसिफने अडविला आणि बांगलादेशला फायदा झाला. परमवीर, गोयारी आणि मनज्योत परमार यांनी पुढच्या तीन प्रयत्नांत गोल केल्यानंतर बांगलादेशच्या गोलरक्षकाने आकाश तिर्कीचा शेवटचा फटका रोखून पुन्हा एकदा आपल्या संघाचा बचाव केला. मोहम्मद पियास अहमद नोव्हा, मोइनुल इस्लाम मोईन, शकील अहद टोपू आणि अश्रफुल हक आसिफ यांनी बांगलादेशला अंतिम फेरीत नेताना पहिल्या चार प्रयत्नांमध्ये कोणतीही चूक केली नाही.

Advertisement
Tags :

.