For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूरचा चेन्नईत 17 वर्षांनंतर पहिला विजय

06:58 AM Mar 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूरचा चेन्नईत 17 वर्षांनंतर पहिला विजय
Advertisement

आरसीबी 50 धावांनी विजयी, पाटीदारचे अर्धशतक, हॅजलवूडचे 3 बळी, 

Advertisement

वृत्तसंस्था / चेन्नई

कर्णधार रजत पाटीदारचे दमदार अर्धशतक तसेच हॅजलवूडच्या 21 धावांत घेतलेले 3 बळीं आणि यश दयाल, सुयश शर्मा व लिव्हिंगस्टोन यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने (आरसीबी)s यजमान चेन्नई सुपर किंग्जवर 50 धावांनी विजय मिळविला. चेन्नईच्या मैदानावर बेंगळूर संघाचा हा 17 वर्षानंतरचा पहिला विजय आहे. 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईतर्फे महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक म्हणजे 4699 धावा जमविल्या असून त्याने यापूर्वी या संघातर्फे खेळणारा सुरेश रैनाचा 4687 धावांचा विक्रम मागे टाकला.

Advertisement

शुक्रवारचा हा या स्पर्धेतील आठवा सामना होता. चेन्नईने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी दिली. आरसीबीने 20 षटकात 7 बाद 196 धावा जमवित चेन्नईला विजयासाठी 197 धावांचे आव्हान दिले. पण आरसीबीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 8 बाद 146 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आरसीबीचा संघ दोन सामन्यांतून चार गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

बेंगळूरच्या डावामध्ये सलामीच्या सॉल्ट आणि कोहली या जोडीने 30 चेंडूत 45 धावा झोडपल्या. नूर अहमदने सॉल्टला यष्टीरक्षक धोनीकरवी यष्टीचित केले. त्याने 16 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 32 धावा जमविल्या. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने कोहलीला साथ देताना दुसऱ्या गड्यासाठी 31 धावांची भर घातली. रविचंद्रन अश्विनने पडिक्कलला झेलबाद केले. त्याने 14 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या.

कर्णधार पाटीदार आणि कोहली यांनी मधल्या षटकांमध्ये 41 धावांची भागिदारी केली. कोहली चाचपडतच फलंदाजी करत होता. त्याने 30 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 31 धावा जमविल्या. नूर अहमदच्या गोलंदाजीवर पूलचा फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहलीने रचिन रविंद्रकडे सोपा झेल दिला. तत्पूर्वी त्याने मिडविकेटच्या दिशेने एक चौकार आणि 1 षटकारही मारला होता. कर्णधार पाटीदारला आज नशाबाची साथ मिळाली. चेन्नईकडून त्याला 3 जीवदाने मिळाली. या जीवदानाचा लाभ घेत त्याने 32 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 51 धावा जमविल्या. चेन्नईच्या दीपक हुडाकडून तसेच रविंद्र जडेजा आणि राहुल त्रिपाठी यांनी रजतचे सोपे झेल सोडले. लिव्हिंगस्टोनने 9 चेंडूत 1 षटकारासह 10 धावा तर जितेश शर्माने 6 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 12 धावा केल्या. बेंगळूर संघातील टीम डेव्हीडने सॅम करनच्या शेवटच्या षटकात 3 उत्तुंग षटकार खेचल्याने आरसीबीला 196 धावांपर्यंत मजल मारता आली. डेव्हीडने 8 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 22 धावा झळकविल्या.

आरसीबीच्या डावामध्ये 12 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. चेन्नईतर्फे  नूर अहमदने 36 धावांत 3 तर लंकेच्या पथीरानाने 36 धावांत 2 तसेच खलिद अहमद व अश्विन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आरसीबीने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 56 धावा जमविताना 1 गडी गमविला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बेंगळूर संघाच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर चेन्नई संघाला 20 षटकात 8 बाद 146 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीच्या रचिन रविंद्रने 31 चेंडूत 5 चौकारांसह 41 तर धोनीने 16 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 30, रविंद्र जडेजाने 19 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25, शिवम दुबेने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 19 तसेच अश्विनने 8 चेंडूत 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. आरसीबीच्या गोलंदाजीसमोर चेन्नईच्या निम्मा संघ 75 धावांत तंबूत परतला होता. कर्णधार गायकवाडला आपले खाते उघडता आले नाही. आरसीबीतर्फे हॅजलवूड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 21 धावांत 3 गडी बाद केले. यश दयाल आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 2 तर भुवनेश्वरकुमारने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: आरसीबी 20 षटकात 7 बाद 196 (रजत पाटीदार 51, कोहली 31, सॉल्ट 32, पडिकल 27, लिविंगस्टोन 10, जितेश शर्मा 12, टीम डेव्हीड नाबाद 22, अवांतर 11, नूर अहमद 3-36, पथीरना 2-36, खलिल अहम्मद व अश्विन प्रत्येकी 1 बळी), चेन्नई 20 षटकात 8 बाद 146 (रचिन रविंद्र 41, दुबे 19, जडेजा 25, अश्विन 11, धोनी नाबाद 30, हॅजलवूड 3-21, दयाल 2-18, लिव्हिंगस्टोन 2-28,

Advertisement
Tags :

.