दबंग दिल्लीकडून बेंगळूर स्मॅशर्स पराभूत
वृत्तसंस्था/चेन्नई
येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर सुरू असलेल्या 2024 च्या युटीटी स्पर्धेतील सामन्यात दबंग दिल्ली संघाने बेंगळूर स्मॅशर्सचा 8-7 असा निसटता पराभव केला. त्याच प्रमाणे दुसऱ्या एका सामन्यात पुणेरी पल्टनने जयपूर पेट्रीऑटस्वर 9-6 अशी मात करत बादफेरीसाठी आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. बेंगळूर स्मॅशर्स आणि दबंग दिल्ली यांच्यातील झालेल्या लढतीमध्ये दबंग दिल्लीच्या दिया चितळेने बेंगळूर स्मॅशर्सच्या टॉपसिडेड मनिका बात्राला पराभवाचा धक्का दिला.
दिया चितळेने मनिकाचा 11-6, 11-10, 11-8 अशा 3-0 गेम्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत बेंगळूर स्मॅशर्सला दबंग दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी स्पर्धेच्या गुणतक्त्यात 48 गुणांसह बाद फेरी सर्वप्रथम गाठली आहे. दबंग दिल्ली संघाने 41 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात पुणेरी पल्टनने जयपूर पेट्रीऑटस्चा 9-6 असा पराभव करत बाद फेरीसाठी आपले आव्हान जीवंत ठेवले आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात पुणेरी पल्टन 28 गुणासह चौथ्या स्थानावर असून जयपूरचा संघ 25 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.