भाजप-निजदची 3 ऑगस्टपासून बेंगळूर-म्हैसूर पदयात्रा
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांची माहिती : सरकारच्या घोटाळ्यांचा करणार निषेध
प्रतिनिधी/ बेंगळूर
वाल्मिकी निगमातील घोटाळा, मुडा घोटाळा आणि दलितांचे पैसे इतर उद्देशांसाठी हस्तांतरित करण्याचा निषेध करण्यासाठी भाजप-निदज पक्ष 3 ऑगस्टपासून बेंगळूर ते म्हैसूरपर्यंत पदयात्रा काढणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिली. रविवारी बेंगळुरात झालेल्या भाजप-निजद पक्षातील नेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. बेंगळूर ते म्हैसूरपर्यंत पदयात्रेद्वारे जाण्यासाठी 7 दिवस लागतील. ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा, एच. डी. कुमारस्वामी हेही पदयात्रेत सहभागी होणार असून याला चालना देणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शनिवार दि. 10 रोजी पदयात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान, त्याठिकाणी केंद्रातील नेतेही येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रविवारच्या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, निजद नेते आणि केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांच्यासह दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेऊन घोटाळ्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. वाल्मिकी निगममधील घोटाळ्यात 187 कोटींचा गैरव्यवहार झाला होता. मुडामध्ये हजारो कोटी ऊपयांचा घोटाळा झाल्याचेही विजयेंद्र यांनी सांगितले.
भ्रष्ट सरकारपासून मुक्ती मिळवूया : येडियुराप्पा
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी, राज्यातील भ्रष्ट सरकार हटविण्याच्या लढ्यात जनतेनेही सहभागी व्हावे. दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढा देणार असून यात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही. लोकसभा आणि राज्यसभेतही याबाबत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांना मान असेल तर गुन्हा मान्य करून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
हे 100 टक्के भ्रष्ट सरकार : प्रल्हाद जोशी
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, राज्यातील सरकार 100 टक्के भ्रष्ट आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना 100 टक्के भ्रष्ट अशी पदवी मिळाली आहे. त्यामुळे आम्ही जनजागृतीसाठी लढा आणि कायदेशीर लढा अतिशय कठोरपणे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.