पावसामुळे बेंगळुरात पाणीच पाणी
24 तासांत 103 मि. मी. पाऊस : जनजीवन विस्कळीत : रस्ते जलमय झाल्याने वाहतूक कोंडी : तिघांचा मृत्यू
बेंगळूर : बेंगळूर शहराला रविवारी रात्री आणि सोमवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. मागील 24 तासांत बेंगळुरात 103 मि. मी. पाऊस झाला. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले. प्रमुख रस्त्यांवर पाणी तुंबल्याने सोमवारी सकाळी कामावर जाणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली. प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान दोन वेगवेगळ्या दुर्घटनांनमध्ये तिघांचा मृत्यू झाला. मागील 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे बेंगळूरमधील जनजीवन विस्कळीत झाले. सखल भागातील लोकवस्त्यांमध्ये पाणी साचल्याने गृहोपयोगी वस्तुंची हानी झाली. गुरुवारपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बेंगळूरमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला.
केंगेरी येथे 132 मि. मी., कोरमंगल येथे 96.5 मि. मी. आणि एचएएल येथे 93 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरात सर्वत्र पाऊस झाल्याने पाणीच पाणी झाले. मुसळधार पावसामुळे स्किल बोर्ड रोडवर सकाळी 7:20 पासूनच वाहनांच्या रांगा लागल्या. जयनगर येथे कार आणि जीपवर वृक्ष उन्मळून पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. माऊंट कार्मेल स्कूल रोडकडे जाणाऱ्या रोडवर वृक्ष उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली. टॅनरी रोडवरील एनसी कॉलनीतही पावसाचे पाणी घराघरातून शिरले. महादेवपूर विभागात सर्वाधिक हानी झाली. येथील साई लेआऊट येथे नागरी वसाहतीत तीन-चार फुटांपर्यंत पाणी साचले होते. गटारींची नियमित स्वच्छता नसल्याने गटारी तुंबून रस्त्यांवर पाणी आले. पणत्तूर एस. क्रॉस, साई, लेआऊट, दोम्मलूर, कोरमंगल रोडवर गुडघाभर पाणी साचल्याने अनेक वाहनांचेही नुकसान झाले. मान्यता टेक पार्क परिसरातही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने संथगतीने पुढे सरकत होती.
भिंत कोसळल्याने महिलेचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी भिंत कोसळल्याने शशिकला (वय 35) नामक महिलेचा मृत्यू झाला. व्हाईटफिल्डच्या चन्नसंद्र येथे ही घटना घडली. शशिकला या व्हाईटफिल्ड औद्योगिक वसाहतीतील इस्मो मायक्रोसिस कंपनीत सकाळच्या शिफ्टमध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. कमावर हजर झाल्यानंतर काही वेळातच भिंत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. बेंगळूर मनपाकडून शशिकलाच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली.
विजेचा धक्का बसल्याने दोघांचा बळी
अपार्टमेंटच्या तळघरात पाणी साचल्याने विजेचा धक्का बसून मनमोहन कामत (वय 63) वर्षीय व्यक्ती आणि दिनेश (वय 12) यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बीटीएम लेआऊट येथे सोमवारी सायंकाळी एन. एस. पाळ्या येथील मधुबन अपार्टमेंट घडली. अपार्टमेंटच्या तळमजल्यात साचलेले पाणी मोटरच्या साहाय्याने बाहेर काढताना ही दुर्घटना घडली.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
बेंगळूर शहरात पावसामुळे अनेक भागात हानी झाल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री आणि बेंगळूर शहर विकास मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बीबीएमपी वॉर रुमला भेट दिली त्यांनी प्रशासकीय अधिकारी तुषार गिरीनाथ यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर व्हर्च्युअल बैठक घेऊन साई लेआऊट, मान्यता टेक पार्क आणि स्किल बोर्ड जंक्शन भागातील समस्यांची पाहणी करावी आणि स्थानिकांकडून माहिती घ्यावी, अशी अधिकाऱ्यांना सूचना केली.