बेंगळूर ग्रामांतर ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांकडून हिंडलगा ग्रामपंचायतीचा पाहणी दौरा
ग्रा. पं.मार्फत राबविलेल्या विविध विकासकामांची पाहणी : विकासकामांबाबत व्यक्त केले समाधान
वार्ताहर/हिंडलगा
बेळगाव जिह्यातील बेळगाव तालुक्यातील हिंडलगा, खानापूर तालुक्यातील बेकवाड, हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी या ग्रामपंचायतींना शासनामार्फत निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामुळेच हिंडलगा ग्रामपंचायतचा विकास कशा पद्धतीने झाला आहे, याची पाहणी करण्याकरता बेंगळूर ग्रामांतर ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पंचायत विकास अधिकारी यांनी दि. 27 रोजी पाहणी दौरा केला. बेंगळूर ग्रामांतर क्षेत्रातील दोड्डबळापूर तालुक्यातील तावरखेडे, होसकोटे, हेगडहळ्ळी, विश्वनाथपूर या ग्रामपंचायतीचा सहभाग होता. ग्रामपंचायतला भेट दिली असता ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात स्वागत कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी हितलमणी अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. तसेच उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, पंचायत विकास अधिकारी अश्विनी कुंदर, सेक्रेटरी अनिल पाटील व कर्मचारी प्रशांत कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथम अश्विनी कुंदर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्व पंचायत विकास अधिकारी, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेला विकास, मिळणारे उत्पन्न, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, सुशोभित करण्यात आलेली स्मशानभूमी, रस्ते, जगजीवनराम सभागृह, वाल्मिकी समाज वसतिगृह याबाबत माहिती पी.डी.ओ.अश्र्विनी कुंदर यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायतचे ज्येष्ठ सदस्य विठ्ठल देसाई यांनी गावची लोकसंख्या, मतदार, तसेच जलजीवन मिशन योजना याकरिता 22 कोटी, जलनिर्मण योजना व गावातील निम्म्या भागात के. यु. डब्ल्यू.के. यु .डब्ल्यू. एस. यामार्फत मिळणारे शुद्ध निर्जंतुक पाणी, केंद्र कारागृह, रेशीम खाते, सध्याचे एव्हीएम मशीनसाठी निर्माण केलेले गोदाम, पंपिंग स्टेशन, कुष्ठरोग दवाखाना, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा याबाबत सविस्तर माहिती करून दिली.
या चर्चेत पाहणी करण्यासाठी आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी चर्चा करून अधिक माहिती मिळवली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र मनोळकर, रामचंद्र कुद्रेमणीकर, सदस्या आरती कडोलकर, रेणुका भातखांडे, लक्ष्मी परमेकर, प्रेरणा मिरजकर, बबीता कोकितकर, सीमा देवकर यांनी देखील आपल्या कार्यक्षेत्रातील विकासाची माहिती करून दिली. या सर्वांनी जमिनीतून घरोघरी वितरित केलेले एलपीजी गॅस, स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, पाण्याची विहीर, पाण्याची टाकी, कचऱ्याची विल्हेवाट याबाबत पाहणी करून समाधान व्यक्त केले. कर्मचारी संतोष नाईक यांनी आभार मानले.