बेंगळूर बुल्स, यूपी योद्धाज विजयी
वृत्तसंस्था / जयपूर
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेंगळूर बुल्सने गुजरात जायंट्सचा 28-24 अशा चार गुणांच्या फरकाने पराभव केला. तर दुसऱ्या एका सामन्यात यूपी योद्धाजने तामिळ थलैवासचे आव्हान 39-22 असे संपुष्टात आणले.
बेंगळूर बुल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील झालेल्या सामन्यात कर्णधार योगेशच्या शानदार बचावात्मक कामगिरीमुळे बेंगळूर बुल्सला हा सामना जिंकता आला. बेंगळूर बुल्स संघातील आकाश शिंदेने 7 गुण मिळवित कर्णधार योगेशला चांगली साथ दिली. सामन्याच्या सुरूवातीला आशिष मलिक आणि आकाश शिंदे यांनी आपल्या चढायांवर बेंगळूर बुल्सला आघाडी मिळवून दिली तर संजय धूल आणि अलिरेझा मिर्झान यांनी गुजरात जायंट्सतर्फे कडवा प्रतिकार करत बेंगळूरची आघाडी कमी केली. पहिल्या पाच मिनिटांमध्ये बेंगळूर बुल्सने गुजरात जायंट्सवर 5-4 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर विश्वनाथच्या शानदार चढाईने गुजरात जायंट्सने बेंगळूरवर 6-5 अशी एका गुणाची आघाडी मिळविली. सामन्याच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या सत्रात बेंगळूर बुल्सने खेळावर आपली पकड राखली. आकाश शिंदेच्या चढाईवर नितीन पन्वर आणि शादलोई हे बाद झाले. या लढतीमध्ये आकाश शिंदे आणि गुजरात जायंट्सचा आशिष यांच्यातच खरी चढाओढ पहावयास मिळाली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत बेंगळूर बुल्सने गुजरात जायंट्सवर 17-13 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात बेंगळूर बुल्सने सुरूवातीला काही गुण घेत गुजरात जायंट्सवर 7 गुणांची बढत मिळविली होती. बेंगळूर बुल्सचा कर्णधार योगेशने शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीत आपल्या संघाची बचावफळी अधिक भक्कम राखल्याने गुजरात जायंट्सला अखेर हा सामना 4 गुणांच्या फरकाने गमवावा लागला.
यूपी योद्धाज विजयी
सुमित सांगवानच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यूपी योद्धासने तामिळ थलैवासचा 39-22 अशा 17 गुणांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. सलग चार सामने गमविल्यानंतर यूपी योद्धासचा हा पहिला विजय आहे.
या सामन्यात सुमित सांगवानने 5 गुण मिळविले. बचावफळीतील महिंद्र सिंग आणि आशु सिंग यांनी दर्जेंदार खेळ केला. तामिळ थलैवाजतर्फे नितीशकुमारने एकाकी लढत देत 7 टॅकल गुण मिळविले. यूपी योद्धासतर्फे गगन गौडाने पहिला गुण प्राप्त केला तर भवानी रजपूतने तामिळ थलैवाजचे खाते दोन गुणांच्या मदतीने उघडले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत युपी योद्धाजने तामिळ थलैवाजवर 15-10 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर युपी योद्धाजने तामिळ थलैवाजचे सर्वगडी बाद केले. सामना संपण्यास 15 मिनिटे बाकी असताना यूपी योद्धाजकडून दुसऱ्यांदा तामिळ थलैवाजचे सर्वगडी बाद झाल्याने यूपी योद्धाजची स्थिती अधिकच मजबूत झाली. आशु सिंगने आपल्या चढाईवर 4 गुण तर सुमित सांगवान आणि महिंद्र सिंग यांनी प्रत्येकी 3 गुण घेतले. यावेळी यूपी योद्धाजने 17 गुणांची भक्कम आघाडी मिळविली होती. सुमित सांगवानने आपल्या दर्जेदार आणि आक्रमक खेळाच्या जोरावर यूपी योद्धाजची पराभवाची मालिका खंडीत करताना तामिळ थलैवाजचा 39-22 असा पराभव केला.