बेंगळूरचा दिल्लीवर 47 धावांनी विजय
ग्रीन सामनावीर, पाटीदारचे दमदार अर्धशतक, अक्षर पटेलचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ बेंगळूर
रजत पाटीदारच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर यजमान बेंगळूर संघाने (आरसीबी) रविवार येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव करत गुणतक्यात 12 गुणासह 5 वे स्थान मिळविले आहे. दिल्ली कॅपिटल्स 12 गुणासह 6 व्या स्थानावर आहे.
बेंगळूरने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले. बेंगळूरने 20 षटकात 9 बाद 187 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव 19.1 षटकात 140 धावा आटोपला.
बेंगळूरच्या गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्स संघाला विजयापासून वंचित रहावे लागले. कर्णधार पंतच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या अष्टपैल अक्षर पटेलने एकाकी लढत देत 39 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह 57 धावा जमविल्या. मॅकगर्कने 8 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 21, तर हॉपने 23 चेंडूत 4 चौकारांसह 29, आणि सलामने 1 चौकारासह 10 धावा केल्या. दिल्लीच्या डावाला पहिल्या षटकापासूनच गळती लागली. सलामीचा वॉर्नर केवळ एका धावेवर झेलबाद झाला. कर्णधार पंतवर एका सामन्यासाठी बंदी घातल्याने तो या सामन्यात खेळू शकला नाही. हॉप आणि पटेल यांनी पाचव्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी केली. दिल्लीच्या डावामध्ये 5 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. बेंगळुरतर्फे दयालने 3 तर फर्ग्युसनने 2 तसेच स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज व ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दिल्लीने पॉवरप्ले दम्यानच्या 6 षटकात 54 धावा जमविताना 4 गडी गमविल्या. दिल्लीचे अर्धशतक 34 चेंडूत, शतक 71 चेंडूत फलकावर लागले. अक्षर पटेलने आपले अर्धशतक 30 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. यष्टीरक्षक दिनेश कार्तिक जखमी झाल्याने अनुज रावत यष्टीरक्षणासाठी मैदानात आला.
तत्पूर्वी 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील रविवारचा हा 62 वा सामना आहे. या सामन्यात दिल्लेने नाणेफेक जिंकून बेंगळूरला प्रथम फलंदाजी दिली. कोहली आणि कर्णधार डु प्लेसीस या सलामीच्या जोडीने 14 चेंडूत 23 धावांची भागीदारी केली. दिल्लीच्या मुकेश कुमारने डु प्लेसीसला 6 धावावर झेलबाद केले. फलंदाजीत सातत्याने धावा जमविणाऱ्या कोहलीने इशान शर्माच्या एका षटकात 2 षटकार त्यानंतर खलील अहमदच्या षटकात 1 षटकार खेचला. कोहलीने केवळ 13 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 27 धावा जमविल्या. पण इशांत शर्माच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात कोहली यष्टीरक्षक पोरलकरवी झेलबाद झाला. बेंगळूरच्या धावसंख्येला आकार देण्याचे काम रजत पाटीदार आणि जॅक्स याने केले.
पाटीदार व जॅक्स या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 53 चेंडूत 88 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. पाटीदारने पहिल्या चेंडूवर मुकेश कुमारला कव्हरड्राईव्हचा चौकार ठोकला. त्यानंतर त्याने आक्रमक फटके मारले. पाटीदारने 32 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 52 तर जॅक्सने 29 चेंडूत 2 षटकार आणि3 चौकारासह 41 धावा जमविल्या. सलामने पाटीदारला पटेलकरवी झेलबाद केले. त्यानंतर कुलदीप यादवने जॅक्सला पटेलकरवी झेलबाद केले. कॅमेरून ग्रीन व लोमरोर या जोडीने पाचव्या गड्यासाठी 37 धावांची भागीदारी केली. खलील अहमदने लोमरोरला पोरलकरवी झेलबाद केले. त्याने 8 चेंडूत 1 षटकारसह 13 धावा जमविल्या. खलील अहमदने आपल्या या षटकातील चौथ्या चेंडूवर लोमरोरला तर सहाव्या चेंडूवर दिनेश कार्तिकला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. 18 षटकात बेंगळुरने 6 बाद 174 धावा जमविल्या होत्या. सलामने स्वप्नील सिंगला झेलबाद केले. कर्ण शर्मा 6 धावावर धावचित झाला. डावातील शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर कर्ण शर्मा तर शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराज धावाचित झाले. ग्रीनने 24 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 32 धावा जमविल्या.
बेंगळूरने शेवटच्या 5 षटकात 49 धावा जमविल्या. बेंगळूरच्या डावात 11 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. बेंगळूरने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 61 धावा जमवितना 2 गडी गमविले. बेंगळूरचे अर्धशतक 29 चेंडूत, शतक 55 चेंडूत तर दीड शतक 98 चेंडूत फलकावर लागले. जॅक्स आणि पाटीदार यांनी अर्धशतकी भागीदारी 25 चेंडूत नोंदविली. पाटीदारने आपले अर्धशतक 29 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने पूर्ण केले. बेंगळूरला अवांतर 10 धावा मिळाल्या. दिल्ली कॅपिटल्सतर्फे खलिल अहमद, रसिक सलाम यांनी प्रत्येकी 2 तर इशान शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला.
संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेजर्स बेंगळुर 20 षटकात 9 बाद 187 (रजत पाटीदार 52, जॅक्स 41, ग्रीन नाबाद 32, कोहली 27, लोमरोर 13, अवांतर 10, खलील अहमद 2-31, आर सलाम 2-23, इशांत शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव प्रत्येकी 1 बळी). दिल्ली कॅपिटल्स 19.1 षटकात सर्वबाद 140 (अक्षर पटेल 57, मॅकगर्क 21, हॉप 29, सलाम 10, अवांतर 6, यश दयाल 3-20, मोहम्मद सिराज 1-31, स्वप्नील सिंग 1-9, ग्रीन 1-19, फर्ग्युसन 2-23).