‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामागे बेंगळूरचेही योगदान
कर्नाटकातील लोकांची प्रतिभा ‘आत्मनिर्भर’साठी पूरक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकातील लोकांची प्रतिभा आत्मनिर्भर भारतासाठी पूरक आहे. येथल जनता आत्मनिर्भर भारत मिशनचे नेतृत्व करत आहेत. बेंगळूर लोकांचे कौशल्य कौतुकास्पद आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामागे बेंगळूरमधील तंत्रज्ञानाचेही मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी येथे 15,611 कोटी ऊपयांच्या बेंगळूर मेट्रो फेज-3 ची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी बेंगळूर मेट्रोच्या यलो लाईनचे उद्घाटन करतानाच नवीन तीन वंदे भारत रेल्वेसेवांनाही हिरवा झेंडा दाखविला.
ऑपरेशन सिंधूरनंतर मी पहिल्यांदाच बेंगळूरला आलो आहे. या ऑपरेशनमध्ये सैन्याचे यश कौतुकास्पद आहे. दहशतवादाविऊद्ध उचललेल्या पावलांमुळे नवीन भारताची क्षमता दिसून आली आहे. मेक इन इंडियाच्या शक्तीमध्ये बेंगळूर आणि कर्नाटकातील तऊणांची मोठी भूमिका आहे. बेंगळूर जगाशी स्पर्धा करण्यास सक्षम असले पाहिजे. आर. व्ही. रोड ते बोम्मसंद्रपर्यंत यलो लाईन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो लोकांना मदत होईल. मेट्रोचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर 25 लाख लोक मेट्रोने प्रवास करतील, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

भारत सर्वात वेगाने वाढणारा देश म्हणून उदयास आला आहे. लवकरच तो तिसरा सर्वात मोठा आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास व्यक्त करताना मोदी म्हणाले, 2014 मध्ये फक्त 5 शहरांमध्ये मेट्रो होती. आता त्याचा 24 शहरांमध्ये विस्तार झाला आहे. गेल्या 11 वर्षांत आपण रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणातही सर्वाधिक कामगिरी केली आहे. विमानतळांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येसह वैद्यकीय शिक्षणातील जागांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशाच्या विकासासोबतच गरिबांचे जीवनही सुधारले आहे. गेल्या 11 वर्षांत 12 कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशात निर्यातीचे प्रमाण जवळजवळ दुप्पट झाले आहे. आपण मोबाईल फोन आयात करायचो. आता आपण सर्वात मोठा मोबाईल निर्यातदार म्हणून उदयास आलो आहोत. त्यात बेंगळूरचे योगदानही मोठे आहे. विकसित भारताचे स्वप्न डिजिटल इंडियाद्वारे साकार करण्याची आवश्यकता आहे. देशात 2,200 हून अधिक सेवा मोबाईलवर उपलब्ध आहेत. नाडप्रभू केंपेगौडा यांच्या दूरदृष्टीमुळे बेंगळूर प्रगती आणि वारसा व्यापणारे शहर बनले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळूरची प्रशंसा केली.
यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे खात्याला 7,500 कोटी ऊपयांच्या अर्थसंकल्पीय योगदानाबद्दल नरेंद्र मोदीजींचे अभिनंदन केले. त्याच वेळी लोकांनी उभे राहून मोदीजींचे आभार मानले. दरम्यान, बोलताना केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी, बेंगळूर हे जगाचे लक्ष वेधून घेणारे शहर आहे. येथील वाहतूक समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जात आहे. गेल्या 11 वर्षात केंद्र सरकारने रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले आहे. विकसित भारतासाठी तयार असलेल्या देशाबद्दल त्यांनी माहिती दिली. प्रारंभी केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमात राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, खासदार शोभा करंदलाजे, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, एच. डी. कुमारस्वामी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि खासदार तेजस्वी सूर्या, पी. सी. मोहन, डॉ. सी. एन. मंजुनाथ आदी उपस्थित होते.