बांगडी बहाद्दर मल्ल पी. जी. पाटील यांचे निधन
कोल्हापूर :
जुन्या काळातील प्रसिद्ध पैलवान आणि उत्तरेचा महाबली सत्पाल विरुद्धच्या तिन्ही लढतीसाठी कुस्ती सम्राट (कै.) युवराज पाटील यांच्याकडून कठोर मेहनत करवून घेतलेले ज्येष्ठ कुस्ती कोच व पाटाकडील तालीम मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष पी. जी. तथा पांडुरंग गोविंद पाटील (वय 83) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. तरुण वयात कुस्ती करताना विरुद्ध मल्लांना बांगडी डावावर आस्मान दाखविणारा बांगडी बहाद्दर म्हणून नाव कमवलेला मल्ल आणि अनेक राष्ट्रीय मल्ल घडविणारा कुस्ती कोच निघून गेल्याने कुस्ती क्षेत्रावर दु:खाची छाया पसरली आहे. पीजी यांच्या रुपाने कुस्तीचे खरे उपासक गमवल्याची भावना कुस्ती क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
पाटाकडील तालीम परिसरातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले पी. जी. पाटील यांनी कुस्तीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. तरुण वयात एक मल्ल म्हणून ते जितके महाराष्ट्रभर गाजले, त्यापेक्षा अधिकपटीने ते कुस्ती कोच म्हणून गाजले. मोतिबाग तालीममध्ये (कै.) बाळ गायकवाड यांच्याकडून कुस्ती धडे घेतले. त्यांनी पतियाळा (पंजाब) येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही पदक जिंकले आहे. विद्यापीठ पातळीवर कुस्ती स्पर्धांमध्ये त्यांनी चॅम्पियन मिळवली होती.
कुस्तीचे धडे घेत त्यांनी पतियाळा येथून एनआयएस कुस्ती कोचची डीग्री मिळवली. कालांतराने मोतिबाग तालीममध्ये कुस्ती कोच म्हणून ते कार्यरत राहिले. त्यांनी महान भारत केसरी दादू चौगुले, हिंदकेसरी चंभा मुत्नाळ, राष्ट्रकुल पदक विजेते राम सारंग, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील, विष्णू जोशीलकर, गुलाब बर्डे, सरदार कुशल, विष्णू फडतरे, बाळू पाटील, अग्नेल व जिजो निग्रो, हिंदकेसरी विनोद चौगुले यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मल्लांना घडवले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत लिपिक म्हणूनही त्यांनी सेवा केली. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेवरही ते कार्यरत राहिले. त्यांनी अनेक वर्षे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या उपाध्यक्ष व सचिव पदाची धुरा सांभाळली. महाराष्ट्र राज्य पीजी यांच्यावर पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी 20 रोजी सकाळी 9 वाजता आहे.
युवराज पाटील आणि पी. जी. पाटील...
युवराज पाटील पाटील यांनी महाबली सत्पाल यांच्याविऊद्ध 1978, 1982 आणि 1984 साली लढती दिल्या. या तिन्ही लढतीत युवराज पाटील यांनी सत्पाल यांना आस्मान दाखवले. कुस्ती कोच पी. जी. पाटील यांना युवराज पाटील यांच्याकडून कऊन घेतलेली कठोर मेहनत महत्वाची ठरली आहे. मेन राजाराम हायस्कूलच्या हॉलमध्ये पीजी यांनी युवराज यांना मॅटवरील कुस्तीचे, शिवाजी विद्यापीठ रोडवर रनिंगचे आणि शाहू खासबाग मैदानात कुस्तीतील डाव आणि मेहनतीचे धडे दिले.