आचरापार पुलावर कोसळलेल्या संरक्षक कठड्यापुरतीच बांधकामकडून मलमपट्टी
दोन्ही बाजूचा उर्वरित जीर्ण कठडा मात्र जैसे थे ; बांधकाम विभाग का दुर्लक्ष करतोय ?
आचरा | प्रतिनिधी
आचरापार नदीवरील मालवण व देवगड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचा संरक्षक कठडा धोकादायक बनला असल्याचे वृत प्रसिद्ध झाल्यानंतर जाग आलेल्या बांधकाम विभागाने फक्त कोसळलेला भाग बांधून काढत दुरुस्त केला आहे. मात्र , पुर्ण पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याची दुरावस्था पाहता पुर्ण दोन्ही बाजूने दुरुस्ती होणे आवश्यक होते. पुलाच्या दोन्ही बाजूचा कठडा हा पूर्ण जीर्ण झालेला असताना कठडा नव्याने उभारला जात नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आचरापार नदीवरील पूल हा मालवण व देवगड तालुक्यांना जोडतो. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक दिवस- रात्र चालू असते. लगतच्या गावातील पादचाऱ्यांची नेहमीच रेलचेल असते. या पूलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षक कठडयाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. काही वर्षांपूर्वी या कठड्याचा भाग कोसळला होता. स्थानिक ग्रामस्थांनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शेवटी , अपघात होऊ नये म्हणून स्थानिक ग्रामस्थांनी लाकडी काठ्या बांधून ठेवल्या आहेत. याच भागाकडून काही अंतरावर पुन्हा संरक्षक कठडा पुन्हा तुटून पडला होता. त्यानंतर यावर वृतपत्रातून लक्ष वेधण्यात आले होते. जागे झालेल्या बांधकाम विभागाने मात्र कोसळलेल्या कठड्यापूरती मलमपट्टी केली आहे. पूर्ण दोन्ही बाजूच्या कठड्याला तडे गेले असून काही ठिकाणच्या कठड्याचे सिमेंटही गळून पडलेले असून काही ठिकाणी तर आतील लोखंडी जीर्ण शिगाही बाहेर डोकावत आहेत असे असताना मात्र बांधकामविभाग कडून पूर्ण कठडा दुरुस्त करणे अपेक्षित होते मात्र तसे न करता तुटलेल्या भागा पुरती मलमपट्टी केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अर्धवट दुरुस्तीमुळे दुर्घटनेचा धोका मात्र कायमच....
आचरा पार नदीच्या पुलावर रोज पर्यटक व स्थानिक ग्रामस्थ फिरण्यासाठी येतात. या कठड्याला टेकून जेष्ठ ,लहान मुले उभी असतात. या पुलावरून आचरा पारवाडीतून करिवणे भागात शेतकरी गुरांची ने-आणही करतात. अशावेळी मोठी दुर्घटना होण्याचा संभव आहे. बांधकाम विभागाने कोसळलेला भाग जरी दुरुस्त केला असला तरी उर्वरित जीर्ण भाग धोकादायक आहे. या जीर्ण भागाकडे बांधकाम विभाग कशासाठी दुर्लक्ष करत आहे असा सवाल केला जात आहे उर्वरित भागाचीही तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती व्हावी अशी मागणी होत आहे.
फोटो परेश सावंत