ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे बांदा- सटमटवाडी रस्त्याचे काम अर्धवट
ग्रामस्थांचा आरोप ; रस्ता वाहतुकीस धोकादायक
प्रतिनिधी
बांदा
बांदा सटमटवाडी ते गाळेल डिंगणे रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट केल्याने पहिल्याच पावसात रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वेळोवेळी मागणी करूनही तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना देऊनही संबंधित ठेकेदार व प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याने रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याचे आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत आम्ही पालकमंत्री नितेश राणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबधित कामासाठी चालढकल करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करणार असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.बांदा सटमटवाडी ते गाळेल डिगणे असा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता मंजूर आहे. प्रत्यक्षात ह्या रस्त्याचे काम सुरु करताना पासून ठेकेदार यांनी वेळकाढू पणा केला होता. दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून सदरचे काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. मात्र तेवढ्यापुरतेच काम करून चालढकलपणा संबंधित ठेकेदाराने केला. सुरुवातीच्या काळात स्थानिक ग्रामस्थांनी ठेकेदाराला टप्याटप्याने काम करण्याची विनंती केली होती मात्र असे असतांनाही आपल्या मर्जीने काम केल्याने काम अर्धवट राहिले.संपूर्ण रस्ता खणून घातल्याने तसेच त्यावर माती मारल्याने गेले चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे चिखल झाला आहे. या मार्गावरून जाणाऱ्याची संख्या जास्त आहे. मात्र चिखल असल्याने दुचाकी सुद्धा या रस्त्याने घेऊन जाणे धोकादायक बनले आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा येत्या काळात कसरत करावी लागणार आहे.ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या भागातील ग्रामस्थांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.