2000 रुपयांच्या नोटा बंद करा : भाजप खासदार सुशील मोदींची मागणी
दोन हजार रुपयांच्या नोटा हळूहळू चलनातून बाद करण्याची मागणी भाजप खासदार सुशीलकुमार मोदी ( MP Sushilkumar Modi ) यांनी सोमवारी राज्यसभेत (Rajyasabha ) केली, ज्या नागरिकांनी अशा नोटा ठेवल्या आहेत त्यांना त्या जमा करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी द्यावा. असेही ते म्हणाले.
शून्य-प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करताना, ते म्हणाले की "देशातील बहुतेक एटीएममधून 2,000 रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. अवैध्य़ व्यवसाय आणि बेकायदेशीर मार्गाला जाणारा पैसा 2 हजारच्या नोटेद्वारे जात आहे. त्यामुळे चलनात कमी पडलेल्या नोटाबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे."
पुढे बोलताना ते म्हणाले, "ज्यावेळी 1,000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या तेव्हा 2,000 रुपयांची नोट आणण्याचा कोणताही तर्क नव्हता. सध्या 2,000 रुपयांच्या नोटांचा साठा केला जात असून अनेकदा त्या ड्रग्ज आणि मनी लाँड्रिंगसारख्या अवैध व्यापारांसाठी वापरल्या जात आहेत. 2,000 रुपयांची नोट ही देशातील सर्वोच्च चलन असलेली नोट काळ्या पैशासाठी समानार्थी बनली आहे." असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात शेवटी "सरकारने टप्प्याटप्प्याने 2,000 रुपयांच्या नोटा बंद कराव्यात. नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी द्यावा," असेही ते म्हणाले. दरम्यान, सीपीएमचे इलामाराम करीन यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) च्या अंमलबजावणीतून गमावलेल्या महसुलासाठी राज्यांना दिलेली भरपाई आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याची मागणी केली आहे.