वनक्षेत्रात विनापरवाना येणाऱ्या पर्यटकांवर बंदी
वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
बेळगाव : वनप्रदेशात वन्यजीवांची सुरक्षितता राखण्यासाठी विनापरवाना जाणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे. खानापूर विभागातील वनक्षेत्रात जंगल ट्रेकिंगसाठी विनापरवाना जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. अशांवर आळा घालण्यासाठी वनखात्याने प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. विनापरवाना वनक्षेत्रात प्रवेश केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. त्यामुळे वनक्षेत्रात असलेल्या दाट झाडी आणि धबधब्यांकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. विशेषत: विकेंडच्या काळात पर्यटक गर्दी करू लागले आहेत. काही पर्यटकांकडून मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजीचे प्रकार घडू लागले आहेत. विनापरवाना घुसखोरी करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी बेळगावातील काही तरुण विनापरवाना वनक्षेत्रात उतरले होते. वाट चुकून काही काळ भरकटल्याने चिंता वाढली होती. मात्र, वनकर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली होती. अशा विनापरवाना पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. अशांवर आळा घालण्यासाठी वनक्षेत्र परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्याबरोबर वनक्षेत्राच्या प्रवेश द्वाराजवळ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विशेषत: गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. वनक्षेत्रात पर्यटकांमुळे वन्यप्राणी सैरभैर होऊ लागले आहेत. यासाठी खबरदारी म्हणून वनक्षेत्रात विनापरवाना येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घातली आहे.