लाल शाईवर बंदी
प्रत्येक देशाचे स्वत:चे असे काही वैशिष्ट्यापूर्ण नियम असतात आणि त्या नियमांचे इतर देशांमधील लोकांना मोठेच आश्चर्य वाटत असते, ही बाब खरी आहे. असे नियम का आहेत आणि ते इतक्या कसोशीने पाळले का जातात, याची अन्य देशांमधील लोकांना कल्पनाही करता येत नाही. अशा प्रकारचे काही नियम त्या देशाचा इतिहास, संस्कृती, धर्म किंवा अनुभवाच्या आधारावर बनविण्यात आलेले असतात. काहीवेळा त्यांच्यामागे काही शास्त्रीय कारण असते. तर काहीवेळा ते चक्क अंधश्रद्धेपोटी बनविले जातात आणि दशकानुदशके पाळलेही जातात. प्रत्येक वेळी हे नियम कायद्यांच्या स्वरुपात असतात असे नाही. पण लोकच ते त्यांच्या स्वत:च्या इच्छेने आणि परंपरा म्हणून पाळत असतात.
दक्षिण कोरिया हा खरेतर वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत पुढारलेला देश आहे. या देशाची तंत्रवैज्ञानिक प्रगती साऱ्या जगात चर्चेचा विषय असते. भारताकही या देशात शोधून काढल्या गेलेल्या अनेक वस्तू आयात होत असतात आणि आपल्यापैकी कित्येकजण त्यांचा उपयोगही करत असतात. पण याच पुढारलेल्या देशात एक अंधश्रद्धा अशी आहे की जिचे आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही.
या देशात लाल शाईने लिहिणे अशुभ मानले जाते. लाल शाईने लिहिल्यास मृत्यू येतो अशी समजूत इतकी घट्ट आहे की, कोणीही लाल रंगाच्या शाईचे पेन किंवा स्केच पेन जवळ बाळगत नाही. तसेच लहान मुलांपासूनही लाल रंगाची शाई किंवा या शाईची पेने दूर ठेवली जातात. हा नियम का निर्माण झाला, याचा इतिहास आहे. या देशात जेव्हा, हजार वर्षांपूर्वी जोसियान वंशाचे राज्य होते तेव्हा राजसत्ता उलथण्यासाठी कारस्थान रचले गेले. ज्यांना मारायचे त्यांची सूची लाल रंगाच्या शाईत बनविण्यात आली होती. तेव्हापासून हा रंग मृत्यूचा रंग मानला जातो आणि ती समजूत आजही अत्यंत कसोशीने या देशातील लोक पाळतात. आणखी एका समजुतीनुसार काही शतकांपूर्वी कोरियात भीषण युद्ध झाले होते. असंख्य सैनिकांचा मृत्यू झाला होता. मृत झालेल्या सैनिकांची नावे त्यावेळी लाल रंगाच्या शाईने लिहून ठेवली जात असत. तेव्हापासून लाल शाई अशुभ मानली जाऊ लागली. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर लाल शाईमुळे मृत्यू होत नाही. पण लोकांच्या श्रद्धांपुढे कित्येकदा विज्ञानाचेही काही चालत नाही, हेच खरे.