बिगर बासमती तांदूळ निर्यातीवरील बंदी हटवली
केंद्र सरकारने मोठा अडथळा केला दूर : शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची आशा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या म्हणजेच परमल तांदळाच्या निर्यातीवरील बंदी तत्काळ प्रभावाने उठवली. यासंबंधीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. तांदळाचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने जुलै 2023 मध्ये ही बंदी लागू केली होती. सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवल्याने त्याचा थेट परिणाम परमल भाताच्या दरावर होणार आहे.
हरियाणा आणि पंजाबमध्ये परमल भात पिकून तयार आहे. परंतु सरकारी खरेदी सुरू होत नसल्याने खासगी खरेदीदार कमी दराने भात खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. आता तांदूळ निर्यातीवरील बंदी हटवण्यात आल्याने बाजारात तेजी येण्याची शक्मयता आहे. भारत हा या तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. भात उत्पादक भागात चांगला पाऊस झाल्याने यंदा देशात तांदळाचे बंपर उत्पादन अपेक्षित आहे. यंदा भात लागवडीखालील क्षेत्र वाढून 41.35 दशलक्ष हेक्टर झाले आहे. यापूर्वी मागील वषी ते 40.45 दशलक्ष हेक्टर होते.
भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. 2022 मध्ये जगात निर्यात झालेल्या तांदळांपैकी 40 टक्के तांदूळ भारतातून आला. जगातील 140 हून अधिक देशांमध्ये एकूण 2.22 कोटी मेट्रिक टन तांदूळ निर्यात झाला. परंतु 2023 मध्ये, सरकारने तांदळाच्या निर्यातीवर अनेक निर्बंध लादले. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात सरकार यशस्वी ठरले होते.
2023 मध्ये तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर देशांतर्गत पुरवठा मजबूत झाला आणि सरकारी गोदामांमध्ये तांदळाचा साठा वाढू लागला. 1 सप्टेंबरपर्यंत भारतीय अन्न महामंडळाच्या स्टोअरमध्ये 3.23 कोटी मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध होता. हा साठा एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 38.6 टक्के अधिक आहे. या स्थितीत निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्यासाठी सरकारकडे पुरेशी कारणे आहेत.
इतर देशांनी उठवला लाभ
2022 मध्ये भारताने निर्यात केलेल्या तांदळाचे प्रमाण थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या एकूण निर्यातीपेक्षा जास्त होते. भारतातील बिगर-बासमती तांदळाच्या सर्वात मोठ्या खरेदीदारांमध्ये बेनिन, बांगलादेश, अंगोला, पॅमेरून, जिबूती, गिनी, आयव्हरी कोस्ट, केनिया आणि नेपाळ यांचा समावेश आहे. तर इराण, इराक आणि सौदी अरेबिया बहुतेक प्रिमियम बासमती भारताकडून खरेदी करतात. भारतातून निर्यातीत घट झाल्यानंतर आशियाई आणि आफ्रिकन खरेदीदारांनी थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि म्यानमारमधून तांदूळ खरेदी केला. मागणीत अचानक वाढ झाल्यामुळे या देशांतील निर्यात दर 15 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता.