प्रदूषण नियंत्रणासाठी रासायनिक फटाक्यांवर बंदी
वन-पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांचा आदेश
बेंगळूर : सण, उत्सवांवेळी फटाक्यांचा वापर सर्रास होत असतो. आनंद द्विगुणित करण्यासाठी फटाके फोडले जातात. मात्र, फटाके फोडण्याने प्रदूषणात भर पडते. फटाक्यांमुळे वायू प्रदूषणाबरोबर, ध्वनी प्रदूषणही होते. याची जाणीव असूनही फटाके फोडणे टाळले जात नाही. त्यामुळे राज्य सरकारनेच आता फटाके फोडण्यावर काही प्रमाणात निर्बंध लादले आहेत. फटाके विक्रेत्य़ांना लोहयुक्त रासायनिक फटाके विक्रीला परवानगी देऊ नये. पर्यावरणपूरक फटाक्यांची विक्री करण्यासंबंधी हमीपत्र लिहून घ्यावे, अशी सूचना वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. रासायनिक फटाके विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करावा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच 15 वर्षे पूर्ण झालेल्या डिझेल वाहनांच्या वापरावर बंदी घालावी. 15 वर्षे पूर्ण झालेली वाहने भंगारात काढावीत, असे त्यांनी म्हटले आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वाहनांची कमतरता असल्याने वाहनांची तपासणी करणे अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे 68 इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या वाहनांचा अधिकाऱ्यांनी सदुपयोग करून घ्यावा तसेच स्थानिक संस्थ़ांच्या सहकार्याने प्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.