कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी करा
कोल्हापूर युवा सेनेची मागणी
बेळगाव : मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी देण्यासाठी कर्नाटक सरकारकडून टाळाटाळ केली जाते. महामेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या महाराष्ट्रातील नेते मंडळींना जिल्हाबंदी केली जाते. त्यामुळे कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनाही महाराष्ट्रात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश खोंद्रे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या सीमालढ्यामध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठी भाषिकांचा महामेळावा होतो. या महामेळाव्याला मागील काही वर्षांपासून परवानगी नाकारली जात आहे. त्यामुळे कर्नाटकातील मंत्री अथवा आमदारांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी विनोद महापुरे, मंदार गुरव, ऋषीकेश दिंडे, सिद्धार्थ वाळवेकर, दिग्विजय निंबाळकर, भिकाजी मोहिते यासह इतर उपस्थित होते.